‘या’ कामांच्या जोरावर आदित्य ठाकरे मारणार निवडणुकीत बाजी!

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरत आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विकासकामांमध्ये ते विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी दिलेल्या वचननाम्यांची पुर्तता आणि आपल्या संकल्पनांमधून साकारलेली विकासकामे आदींचा मिलाप करत ते मुंबईकरांसमोर जाणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सकारात्मक दृष्टीकोनातून प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतील कामे प्रत्यक्षात साकारली गेल्याने या विकासकामांची भर पडल्याने शिवसेनेची बाजू आणखी मजबूत झाली आहे.

महापालिकेवरील भगवा कायम राखण्यासाठी अधिक धडपड

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचेच सरकार राज्यात आहे. त्यामुळे शिवसेनेची बाजू मजबूत असून मुंबई महापालिकेवरील भगवा कायम राखण्यासाठी त्यांची अधिक धडपड सुरु आहे. त्यामुळे सन २०१७ च्या निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याची पुर्तता या प्रमुख मुद्यावर जनतेसमोर जाणारी शिवसेना यंदा युवा नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून साकारलेली विकासकामे आदींचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. वचननाम्यांची पुर्तता करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतानाच महापालिकेतील प्रत्येक विभाग कार्यालयांमध्ये उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता तसेच सहायक अभियंता यांच्या संकल्पना जाणून घेत त्यांना प्रोत्साहन देत गतीही देण्याचा प्रयत्न केला. त्यातून आता या नव्या संकल्पनेतील विकासकामे ही मुंबईतील शोभा वाढवणारी ठरवणारी आहे. तसेच मुंबईच्या विकासाची दूरदृष्टी आदित्य ठाकरेंकडे असल्याची भावना आता मुंबईकरांकडून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

(हेही वाचा बेस्ट गाड्यांमध्ये लस प्रमाणपत्र तपासतच नाही! कारण…)

ही कामे आदित्य ठाकरेंसाठी ठरणार फायद्याची…

मुंबई महापालिकेतील हेरिटेज वॉक, पदपथांची सुधारणा, महापालिका मुख्यालयासमोरील सेल्फी पॉईंट, दादर आणि गिरगाव चौपाटीवरील व्हिविंग गॅलरी, पेट गार्डन, माहिम चौपाटीचे सुशोभिकरण, हेरिटेज भागातील रस्ते आणि पदपथांचा विकास, क्रांती मैदान ते मणी भवन स्वातंत्र्यभूमी कॉरिडॉर, माहिम ते वांद्रे किल्ला सायकल ट्रॅक, परळ हिंदमाता सिनेमागृहाजवळ साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सेंट झेवियर्स मैदान व दादरमधील प्रमोद महाजन कला पार्क येथील दोन भूमिगत टाक्या बसवणे अशा प्रकारच्या प्रमुख कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. त्यातून आता ही कामे प्रत्यक्षात साकारली जात आहेत. आदित्य ठाकरे यांना ज्या ज्या सहायक आयुक्तांच्या संकल्पना आवडल्या, त्या विभाग कार्यालयामार्फत न राबवता प्रशासनाने खात्यांतर्गत राबवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे ही कामे पूर्णत्वास आल्याने किंबहुना ती येत असल्याने शिवसेनेच्या वचननाम्यांच्या पुर्ततेबरोबरच याही नव्या संकल्पनेतील भर पडल्याने शिवसेनेची प्रतिमा अधिक सुधारण्यास मदत होत आहे. परिणामी या कामांमुळे आदित्य ठाकरे यांचे व्यक्तिमत्व सुधारण्यास तसेच त्यांची प्रतिमा चांगल्याप्रकारे जनमानसांत तयार होण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा मोठा हातभार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या या संकल्पनेतील साकारलेली विकास कामे आदित्य ठाकरे यांना आगामी निवडणुकीत एकप्रकारे फायदेशीर ठरणारी असल्याचे दिसून येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here