वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुरूवारी हजर झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाचा अवमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर 2020 मध्ये भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्या प्रकरणात हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार गुणरत्न सदावर्ते पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.
एका व्यक्तीने छत्रपती संभाजी राजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार दिली होती. त्यानुसार सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदावर्ते यांनी एका वृत्त वाहिनीवर मुलाखत दिली होती. त्यावेळी सदावर्तेंनी मराठा समाजाचा अवमान केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता.
(हेही वाचा – “सरकार अल्टिमेटमवर नाही तर कायद्यावर चालतं”; अजित पवारांनी दरडावलं)
काही दिवसांपूर्वी मराठा समाजातील नेत्यांनी सदावर्तेंच्या तक्रारीबाबत न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिल्याने भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याबाबत कार्यवाही केली असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सदावर्ते यांना काल दुपारी चौकशीसाठी बोलावून घेतले होते. त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास चौकशीसाठी बोलावले होते. साधारण दोन तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सदावर्ते हे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात आक्रमक होत घोषणाबाजी केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर, राजेंद्र कुंजीर यांच्यासह अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.