परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीने गुरूवारी सकाळी छापा टाकला. यानंतर राज्यातील राजकारण अधिक तापलं. ईडीने केलेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते मंडळींनी सुड बुद्धीने ही कारवाई केली असे म्हणत केंद्रावरती टीका केली आहे. अशातच वकील गुणरत्न सदावर्तेंचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये सदावर्ते काही कामगारांसोबत आनंद व्यक्त करताना दिसले. यावेळी त्यांनी अनिल परब यांची मिश्कीलपणे खिल्ली उडविली. जैसी करनी वैसी भरनी असे म्हणत त्यांनी लाडू वाटून हा आनंद साजरा केला आहे.
लवासा घोटाळा, सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळा करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिल्यावर हा गुण लागणारच, वाण नाही पण गुण लागतोच, असे म्हणत त्यांनी आता मनी लॉंन्ड्रिंग प्रकरणातील गुन्ह्याची उकल होणार आहे असे सांगितले आहे. हा आनंद व्यक्त करताना त्यांच्यासोबत एसटी कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनीही एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला आहे.
(हेही वाचा – कृष्ण जन्मभूमी प्रकरण: जुलै महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता)
काय म्हणाले सदावर्ते
जैसी करनी वैसी भरनी असे म्हणून सदावर्तेंसह कामगारांनी परबांवरील ईडीने केलेल्या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला. जशी ज्याची करनी तशी त्याची भरनी… त्यामुळे जे काही होतंय ते योग्य होत आहे, संविधानिक होत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, दुःख असतात. या देशाला ज्यांनी पैशाचा भ्रष्टाचार करून पोखरायला सुरूवात केली. त्यातील कुणाला तरी पकडलं जात आहे. त्यानिमित्ताने हे कष्टकरी एकत्र आले आहेत. जे योग्य होतंय. त्यासाठी हे लाडू आहेत, असे त्यांनी सांगितले. तर आम्ही जेलमध्ये जाताना भारत माता की जय म्हणत होतो. जेव्हा आज कुणावर तरी मनी लॉंन्ड्रिंगच्या केसमध्ये गुन्हा दाखल होतोय, म्हणून तेव्हा ते फटीतून दिसत आहेत, असे ते खोचकपणे म्हणाले.