एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने बंडखोर आमदारांच्या जाहिराती स्वीकारणे बंद केले. मात्र, एकनाथ शिंदे यांचे भलेमोठे छायाचित्र असलेली जाहिरात शनिवारी सामनामध्ये प्रसिद्ध झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
( हेही वाचा : समीर वानखेडे यांना दिलासा; जन्माने मुस्लिम नसल्याचा जात पडताळणी समितीचा निष्कर्ष)
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक आणि अन्य पदाधिकारी सामनामध्ये जाहिराती देतात. गेल्या काही वर्षांपासून जणू ही प्रथाच झाली आहे. यंदा ठाकरेंच्या वाढदिवसाआधीच पक्षात फूट पडली. ४० आमदार आणि १२ खासदार शिंदेंसोबत गेले. मात्र, बंडखोरीनंतरही यातील बहुतांश नेत्यांनी उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त सामनामध्ये जाहिरात देण्याची तयारी दर्शवली. पण सामनाने ती नाकारली.
त्यामुळे यापुढे शिंदे गटातील नेतेमंडळींच्या जाहिराती सामनामध्ये दिसणार नाहीत, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, बंडखोरांचे पुढारी असलेल्या एकनाथ शिंदे यांचीच जाहिरात सामनामध्ये प्रसिद्ध झाल्याने त्याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.
जाहिरातीत काय?
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, अशा आशयाची ही जाहिरात आहे. सामनाच्या मुख्य अंकात पान क्रमांक तीनवर प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडून ती सामनाला प्राप्त झाली आहे.
Join Our WhatsApp Community