संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर होणार वृक्षारोपण; जाणून घ्या कोणती वृक्षे लावणार?

152

महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची  केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर  उपस्थित होते.

याबाबत नितीन गडकरी यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.

या पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले.

पालखी मार्गावर वृक्षांची लागवड 

पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, असेही केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.