आमदारांचे फुटणे, शिवसेनेच्या पथ्यावर

175

फुटीर शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सुमारे ४० आमदारांनी बंड केल्यानंतर,  बिथरलेल्या शिवसैनिकांना धीर देण्यासाठी आता शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे हे प्रत्येक विभागांतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या सभा घेत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होत चालले जात होते. मागील अडीच वर्षांत संघटनेला वेळ न देणारे पक्षप्रमुख आणि युवा सेना अध्यक्ष हे आता शिवसैनिकांशी संवाद साधू लागले असून, विभागाविभागांमधील शिवसैनिकांशी होणाऱ्या या संवादामुळे पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणीच्या दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे आमदार फुटणे हे शिवसेनेच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख हे लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत नसल्याने, आजवर ते संघटनेच्या कामांकडे विशेष लक्ष ठेवून होते. परंतु २०१९च्या निवडणुकीनंतर भाजपसोबत युती न करता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करून राज्यात शिवसेनेने सरकार स्थापन केले. या सरकारमधील प्रमुख पक्ष बनत शिवसेनेने आपले सरकार बनवल्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. तर २०१९ च्या निवडणुकीत प्रथमच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती जनतेमधून निवडून येत आमदार बनले होते. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे आमदार बनले आणि पुढे सरकारमध्ये पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्रीपद त्यांनी भूषवले.

…म्हणून युवा सेना आणि पक्षप्रमुख मैदानात 

सरकारमध्ये उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे नवखे असल्याने, त्यांनी आपल्या पदाचा कारभार समजून घेताना पदाचा भार सांभाळताना त्यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होत होते. मागील अडीच वर्षांत मुख्यमंत्री व मंत्री पदामुळे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांना उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे दर्शन दुर्लभ बनले होते. त्यांची भेटही शिवसेना पदाधिकाऱ्यांना होत नसल्याने, अनेकदा आंदोलने आणि इतर भूमिका मांडताना शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचीही अडचण व्हायची. त्यामुळे मागील अडीच वर्षांत शिवसेना संघटना बांधणीत नेतृत्वाअभावी कमजोर होत चालली होती. परंतु एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख व युवा सेना अध्यक्षांना प्रत्यक्षात मैदानात उतरावे लागले.

( हेही वाचा “बाळासाहेबांना अटक करणा-या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना यातना नाही का होत?” शिंदेंचे नवे ट्वीट )

बंडानंतर बैठकांचे सत्र सुरु

आमदार, खासदारांसह आपले नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक फुटतील या भीतीने बंडखोर आमदारांविरोधात उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी सभा घेण्यास सुरुवात केली आहे. पक्ष फुटीनंतर उध्दव ठाकरे यांनी सर्व शिवसेना जिल्हाप्रमुख व तालुका प्रमुख यांची ऑनलाईन बैठक घेतली तसेच राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील दोन हजार नगरसेवकांची ऑनलाईन बैठक घेतली. त्या पाठोपाठ दक्षिण मुंबई विभाग क्रमांक १२, विभाग क्रमांक ६ मधील कुर्ला व कलिना विधानसभा, विभाग क्रमांक ११ आदींची बैठक घेतली, तसेच रविवारी शिवसेना भवनमध्ये युवा सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेतली. दहिसरमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी सभा घेतली. याशिवाय शिवसेना भवनमध्ये मुंबईतील नगरसेवक व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करून बंडखोरांविरोधात आवाज उठवत शिवसैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जे मागील अडीच वर्षांत दुर्लक्ष झाले होते, ते आता आमदार फुटल्याने उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना पुन्हा शिवसैनिकांच्या संपर्कात जावे लागले,असे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.