उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेस सीबीआयला दिल्यानंतर, अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सध्या तरी या पदाचा कार्यभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असून, भविष्यात या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांचे नाव कोरले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बाबतचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने २१ मार्च रोजीच दिले होते. त्यामुळे आता या पदावर त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
(हेही वाचाः देशमुखांची विकेट पडणार, दिलीप वळसे-पाटील गृहमंत्री होणार?)
गृहमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही
गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्याचा भर शरद पवार यांचा आहे. मात्र यावेळी गृहखाते अत्यंत अभ्यासू आणि शरद पवार यांच्या मर्जीतील व्यक्तीकडे देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि दिलीप-वळसे पाटील यांची नावे असल्याचे समजते. यामध्ये शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे-पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहखात्याची जबाबदारी दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सुरुवातीला दिली जाऊ शकते. मात्र दिलीप वळसे-पाटील हे सध्या आजारी असल्याने त्यांनी जर या अत्यंत महत्त्वाच्या अशा मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्यास नकार दिला, तर जयंत पाटील यांच्याकडे देखील गृहखाते जाऊ शकते, असे बोलले जात आहे.
(हेही वाचाः अखेर अनिल देशमुख राजीनामा देणार!)
वळसे-पाटील शांत, संयमी!
गृहमंत्रीपदासाठी आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाचा विचार सुरू असून, दिल्लीत सध्या यासाठी बैठक सुरू आहे. दिलीप वळसे-पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली होती. दिलेली जबाबदारी चोखपणे बचावणे आणि वादापासून दूर राहणे ही वळसे-पाटील यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे-पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि पक्षाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
जयंत पाटील यांची कारकीर्द
याआधी मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर डिसेंबर 2008 मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे जयंत पाटील यांना देखील गृहखात्याच्या अनुभव आहे. तसेच जयंत पाटील हे देखील शरद पवार यांच्या जवळचे आहेत. त्यामुळं आता गृहखात्यासाठी राष्ट्रवादीकडून ही दोन नावे जोरदार चर्चेत आहेत.
Join Our WhatsApp Community