दोन ‘अनिल’ रडारवर, ठाकरे सरकार ‘गॅस’वर!

एकीकडे अनिल देशमुख यांची चौकशी सुरू असताना, शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब हे देखील येत्या काही दिवसांत रडारवर येण्याची शक्यता आहे.

90

एकीकडे राज्य सरकार कोरोना संकटाचा सामना करत असताना, सरकारला आता राजकीय आघाडीवर देखील मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणात सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर सीबीआयने मुंबईत ठिकठिकाणी छापासत्र सुरू केले आहे. मात्र एकीकडे अनिल देशमुख यांची चौकशी सुरू असताना, शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब हे देखील येत्या काही दिवसांत रडारवर येण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारमधील या दोन ‘अनिल’मुळे ठाकरे सरकार सध्या गॅसवर असल्याची चर्चा, राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली आहे.

देशमुखांच्या चौकशीची ठाकरे सरकारला आधीच चाहूल

अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी अधिक गतीने सुरू असल्याची चाहूल राष्ट्रवादी आणि शिवसेनेला होती. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी भेट घेतली होती. या बैठकीत अनिल देशमुख यांच्याबाबत चर्चा देखील झाली. देशमुख यांच्यानंतर अनिल परब हे देखील रडारवर येण्याची शक्यता बळावल्याने, शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या. अनिल देशमुख यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, तर अनिल परब यांच्यावर जर येत्या काळात कारवाई झाली तर शिवसेना अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एव्हाना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुखांना याची कुणकुण लागली आहे. त्याचमुळे सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर छापे मारल्यानंतर, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. एवढेच नाही तर हे दोन्ही अनिल सध्या अडचणीत असल्याने राज्य सरकारकडून माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशीही जलद गतीने करण्याची धडपड सुरू झाली आहे.

(हेही वाचाः अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयची धाड! लॅपटॉप, फाईल्स ताब्यात घेतल्या! )

परिवहन विभागातील बदल्यांचे कागद सीबीआयच्या हातात?

काही दिवसांपूर्वी परिवहन विभागात बदल्यांचे घोटाळ्यांवर घोटाळे झाल्याची तक्रार, भाजप खासदार किरिट सोमय्या यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सीबीआयकडे केली होती. परिवहन विभागातही एक सचिन वाझे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. सचिन वाझे हा बडे अधिकारी, काही सत्ताधा-यांसाठी खंडणी वसुुलीचे काम करत होता. त्याच धर्तीवर बजरंग खरमाटे हा परिवहन विभागातील सचिन वाझे असल्याचा चिमटा किरिट सोमय्या यांनी काढला होता. तसेच सोमय्या यांनी असा दावा केला होता की, परिवहन विभागातील बदली रॅकेटबाबत त्यांच्याकडे एक तक्रार आलेली आहे. बदल्यांचे रेट किती? २५ लाख, ५० लाख, एक कोटी की आणखी किती या बाबतची माहिती त्यात आहे. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, यासाठी त्यांनी राज्यपाल व सीबीआयकडे मागणी केली होती. सोमय्या यांच्या या मागणीवर सीबीआयने चौकशी सुरू केली असून, याचीही काही कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे. त्याचमुळे शिवसेनेच्या अनिल परब यांना घेरण्यासाठी सीबीआयने सर्व प्रकरणातील कागदपत्रे जमा करायला सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अनिल परब देखील देशमुखांप्रमाणेच रडारवर येतील, अशी चिन्हे दिसत आहेत.

(हेही वाचाः परबांमुळे जुने-जाणते शिवसैनिक ‘मातोश्री’ला झाले ‘पोरके’?)

वाझेच्याही पत्रामुळे अनिल परब अडचणीत

सचिन वाझे याने स्वतःच्या हस्ताक्षरात एनआयएला पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब यांचा देखील उल्लेख केला होता. २०२० मध्ये मला पोलिस दलात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण शरद पवारांचं मतपरिवर्तन करू, त्याचबरोबर गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती करू, असं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला नागपूरमधून फोनवर सांगितलं होतं. या कामासाठी देशमुख यांनी माझ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा दावा वाझेने या पत्रात केला होता. तसेच ऑक्टोबर २०२०मध्ये देशमुख यांनी मला सह्याद्री अतिथी गृहावर बोलावले होते आणि शहरातील १ हजार ६५० रेस्टॉरंट आणि बार यांच्याकडून वसुली करण्यास सांगितले होते. त्यावेळी हे आपल्या क्षमतेच्या पलिकडे असल्याचे आपण त्यांना सांगितले होते. जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी परब यांनी मला बोलावले होते. सुरुवातीला SBUT बद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितले होते. त्याचबरोबर चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी SBUTकडून ५० कोटी रुपये मागितले होते. हे काम करण्यास आपण असमर्थता दर्शवली. कारण आपल्याला SBUT बद्दल माहिती नव्हती. त्याचबरोबर चौकशीवरही आपले कोणतेही नियंत्रण नव्हते, असे वाझे याने पत्रात म्हटले होते.

(हेही वाचाः सचिन वाझेला कोठडीत हवे पेन, पेपर आणि… पुन्हा फोडायचा आहे ‘लेटर बॉम्ब’?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.