अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. शनिवारी, २४ फेब्रुवारी रोजी नांदेडमधील काँग्रेसचे ५५ अंजी नगरसेवकांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली असून निवडणूक बिनविरोध झाल्याने त्यांची खासदारपदी वर्णीही लागली. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचे समर्थक कार्यकर्तेही काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज चव्हाण यांनी आपला बालेकिल्ला असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला धक्का दिला.
अशोक चव्हाणांनी केले स्वागत
नांदेड -वाघाळा महानगरपालिकेतील ५५ माजी नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत करतो, असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले. दरम्यान, नांदेड हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांना नांदेडमधून पराभवाचा सामना करावा लागला असला तरी जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्क असून कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांनंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) समर्थक आमदार आणि अन्य काही नेतेही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत येत्या काही दिवसांत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community