दिल्लीतील कुतुबमिनार मनोरा सध्या वादात सापडला आहे. अयोध्या, काशी, मथुरा आणि ताज महालनंतर आता कुतुबमिनारचा वाद वाढताना दिसत आहे. हिंदू संघटनेच्या नेत्यांनी येथे हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती, मात्र त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव बदलून विष्णूस्तंभ ठेवावे, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.
काय आहे कुतुबमिनारचा इतिहास?
दिल्लीतील मेहरौली येथे कुतुबमिनार हा भारतातील हा सर्वात उंच मनोरा आहे. त्याच्या जवळच छतरपूर मंदिरही आहे. हा जागतिक वारसा मानला जात आहे. हा मनोरा तीन मुस्लिम शासकांनी वेगवेगळ्या वेळी बांधला होता. या मनोऱ्याचे बांधकाम 1193 साली सुरू झाले. असे म्हणतात की दिल्लीचा पहिला मुस्लिम शासक कुतुबुद्दीन ऐबक याने त्याचे बांधकाम सुरू केले. कुतुबुद्दीनने मिनारचा पाया घातला आणि त्याला पाया आणि पहिला मजला बांधण्यात यश आले. कुतुबुद्दीननंतर, त्याचा उत्तराधिकारी आणि नातू इल्तुतमिश याने मिनारचे आणखी तीन मजले बांधले. 1368 साली मिनारचा पाचवा आणि शेवटचा मजला फिरोजशाह तुघलकने बांधला होता. पुढे लोदी घराण्याचा दुसरा शासक सिकंदर लोदी याने त्याची दुरुस्ती करून घेतली, असेही म्हटले जाते. त्याच्या बांधकामासाठी लाल वाळूचा दगड आणि संगमरवरी वापरण्यात आला आहे. यामध्ये एकूण 397 पायऱ्या करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा नवनीत राणांप्रकरणी लीलावती रुग्णालयाकडून गुन्हा दाखल)
काय आहे वाद?
मनोऱ्याच्या भिंतींवर हिंदू देवदेवतांची शिल्पे आहेत आणि मंदिरातील वास्तुकला आहे. याचे मनोऱ्यामध्ये स्पष्टपणे दर्शन घडते. मनोऱ्यामध्ये श्री गणेश आणि श्री विष्णू यांच्या अनेक मूर्तीही बसवलेल्या आहेत. त्याच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख बांधण्यासाठी 27 हिंदू आणि जैन मंदिरांतील स्तंभ आणि इतर वस्तू तोडून त्या वापरण्यात आल्या आहेत. च्या विध्वंसात वापरण्यात आल्याचे सांगितले जाते.
काय आहे हिंदू संघटनेचा दावा?
माजी राज्यसभा खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते तरुण विजय यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (ASIA) पत्र लिहिले आहे. त्यांनी त्या पत्रात मिनारच्या आवारात श्री गणेशाची मूर्ती उलटी बसवल्याचा आणि एका ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती पिंजऱ्यात बंद करून ठेवण्यात आली होती, असा दावा केला. अशा प्रकारे या ठिकाणी हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे पुतळे राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्याची विनंती भाजप नेत्याने केली होती.
काय आहे मागणी?
तत्पूर्वी, ज्या २७ मंदिरांना पाडून हा मनोरा बांधण्यात आला आहे, त्यांचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती नेहा शर्मा म्हणाल्या होत्या की, ‘भूतकाळात अनेक चुका झाल्या आहेत, हे आम्ही जाणतो, परंतु अशा चुका सुधारल्यास वर्तमान आणि भविष्यात शांतता भंग होऊ शकते.’ हिंदुत्ववादी संघटनांनी या मनोऱ्याचे नाव बदलून विष्णूस्तंभ ठेवावे आणि येथे हिंदू आणि जैन धर्मियांना पूजा करण्याचा अधिकार मिळावा. 2004 पूर्वीचा असा दावाही त्यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community