बार मालकांनंतर आता व्यापाऱ्यांकडून ‘वसुली’? 

कोरोनामुळे सायंकाळी ४ वाजल्यानंतर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश आहे. याचाच फायदा घेत व्यापाऱ्यांकडून वसुली सुरु आहे, असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

131

सध्या राज्याच्या राजकारणात ‘वसुली’ शब्दाने भल्याभल्यांची झोप उडवली आहे. बार मालकांकडून १०० कोटी रुपये वसूल करा, असा आदेश दिल्याच्या आरोपावरून अनिल देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, आता ठाकरे सरकारवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘वसुली’चा आणखी एक आरोप केला आहे. आता व्यापाऱ्यांकडून वसुली होत आहे, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे, मात्र  यात नक्की कोण सहभागी आहेत, याचा खुलासा करण्यात आला नाही.

व्यापाऱ्यांकडून वसुली? 

सध्या कोरोनामुळे मुंबईसह राज्यातील सरसकट सर्व जिल्हे हे लेव्हल – ३ मध्ये सामावून घेण्यात आले आहेत. त्यामुळे यातील निकषानुसार दुकाने सायंकाळी ४ वाजल्यानंतर बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. याचाच फायदा घेत व्यापाऱ्यांकडून वसुली सुरु आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून तसा आरोप केला आहे.

काय म्हटले आहे देशपांडे यांनी ट्विटमध्ये? 

आधी वसुली बार मालकांकडून…
आता वसुली व्यापाऱ्यांकडून…!
मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरू…..सायंकाळी चार नंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी  मोठे दुकान 5000मध्यम दुकान2000छोटे दुकान1000 वसुली चे नवे रेट कार्ड

पोलिसांवर आरोप?

सरकारने लावलेल्या कोरोनासंबंधी निर्बंधांचे पालन होते का, हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर देण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळी ४ वाजल्यानंतर पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या रस्त्यावर फिरतात आणि दुकाने बंद केली जात आहेत का, याची पडताळणी करत असतात. जे दुकाने सुरु असतात, त्या दुकानदारांवर कारवाई करतात. त्यामुळे संदीप देशपांडे यांचा हा वसुलीचा आरोप थेट पोलिसांवर आहे का?, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.