तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेत बसणार नाही! असे का म्हणाले भास्कर जाधव?

103

विधानसभेला अध्यक्ष मिळेपर्यंत भास्कर जाधवच तालिका अध्यक्ष पाहिजे असेल, असे जर सरकारला वाटले, तर सरकारचा कायमस्वरुपी अध्यक्ष बसेपर्यंत मी ती जबाबदारी पार पाडेन. माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून मी काम करेन. पण एकदा नियमित अध्यक्षाची नेमणूक झाली, तर मी तालिका अध्यक्ष म्हणून बसणार नाही, अशी घोषणा शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केली.

त्यावेळी फडणवीसांनी माफी मागितलेली

विधानसभेचा निर्णय असंवैधानिक आहे किंवा नाही ते आताच म्हणता येणार नाही. कारण अजून सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण निकाल हाती आलेला नाही. भारतीय जनता पार्टीचा एकंदरीत गुणधर्म पराचा कावळा करणे हा आहे. दीर्घकाळ निलंबन असू नये, हा शब्दप्रयोग न्यायालयाने केला, हे खरे आहे. पण त्यावेळेस जे काही घडले ते नियमबाह्य झालेले नव्हते. कुठेही घटनाबाह्य झालेले नव्हते. प्रथा-परंपरा सोडून काही झाले नाही. ज्या वेळेस 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात आला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आमच्या लोकांनी चूक केली. आमच्या लोकांनी चुकीचे शब्द वापरले. आमच्या लोकांनी गैरवर्तन केले आणि त्याबद्दल आम्ही माफी मागितली. मी पूर्ण माफी मागतो असे फडणवीस म्हणाले होते. याचा अर्थ जे निलंबन झाले, ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सुद्धा मान्य केलेले आहे. त्यांचे निलंबन झाले ते घटनाबाह्य झाले, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असेही भास्कर जाधव म्हणाले.

(हेही वाचा गणवेषाऐवजी मला बुरखा घालू द्या! मुस्लिम विद्यार्थीनीच्या मागणीला चपराक)

सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर भाजपने महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर थेट शिवसेना नेते भास्कर जाधव यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. भाजपचे संख्याबळ कमी करण्यासाठीच भास्कर जाधव यांनी षडयंत्र केले होते. त्यामुळेच आमचे 12 आमदार निलंबित झाले. त्यांच्यामुळेच हे घडले. तरीही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय न मान्य करण्याची त्यांची मानसिकता असेल, तर देव या सरकारचे भले करो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.