उत्तर प्रदेशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाही भाजपचा एक ज्येष्ठ नेता, आमदार मात्र दु:खी बनला आहे. कारण उत्तर प्रदेशाची निवडणूक आता त्या आमदाराचा संसार मोडण्यास कारणीभूत ठरणार आहे.
घटस्फोटाची याचिका पुन्हा सुरू केली
भाजपा नेते आणि आमदार दयाशंकर सिंह यांना घटस्फोट देण्याचा निर्णय त्यांची पत्नी आणि मावळत्या उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री स्वाती सिंह यांनी घेतला आहे. स्वाती सिंह यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आधीपासून सुरू असलेला घटस्फोटाचा खटला पुन्हा सुरू करण्यात यावा यासाठी स्वाती सिंह यांनी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दिला आहे. स्वाती सिंह यांनी २०१८ मध्येच घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. मात्र तेव्हा दोन्ही पक्ष न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने ही केस बंद केली होती. मात्र आता स्वाती सिंह यांनी अतिरिक्त मुख्य न्यायाधीशांच्या न्यायालयात ही केस पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज दिला आहे. त्यावर न्यायमूर्तींनी आपला निर्णय राखून ठेवला.
(हेही वाचा शिवतीर्थावर महाराजांच्या साक्षीने राज ठाकरेंनी दिली मनसैनिकांना ‘ही’ शपथ)
कोण आहेत स्वाती सिंह?
स्वाती सिंह यांनी घटस्फोटाची याचिका पुन्हा सुरू करण्यामागे उत्तर प्रदेश निवडणूक कारणीभूत ठरली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्वाती सिंह आणि दयाशंकर सिंह यांच्यातील वाद उफाळून आला. त्यावेळी या पती-पत्नींनी सरोजिनीनगर मतदारसंघावर दावा केला होता. मात्र पक्षाने दोघांनाही उमेदवारी नाकारत राजेश्वर सिंह यांना उमेदवारी दिली होती. ते तिथून विजयी झाले. तर दयाशंकर सिंह हे बलिया येथून विजयी झाले. मात्र स्वाती सिंह यांना उमेदवारी मिळाली नव्हती. उत्तर प्रदेशच्या राजकारणात सामान्य गृहिणी ते आमदार आणि नंतर मंत्री असा स्वाती सिंह यांचा प्रवास अनेक नाट्यांनी भरलेला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दयाशंकर सिंह यांनी बसपाप्रमुख मयावतींबाबत अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर संतापाची लाट उसळल्याने भाजपाने त्यांना पक्षातून काढले होते. त्याचवेळी नसीमुद्दीव सिद्दिकी आणि बसपाच्या इतर नेत्यांनी स्वाती सिंह आणि त्यांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तिथूनच पेटून उठलेल्या स्वाती सिंह यांनी बसपा आणि मायावतींविरोधात आघाडी उघडली. त्यानंतर भाजपाने त्यांची थेट पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड केली होती. तसेच स्वाती सिंह यांना सरोजिनीनगर येथून उमेदवारीही देण्यात आली. तिथे त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या.
Join Our WhatsApp Community