काँग्रेसमध्ये प्रवेशाचा प्रयत्न केला, पण कुणीतरी खोडा घातला! सुनील देशमुखांचा गौप्यस्फोट 

भाजप नेते नितीन गडकरी यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध होते. त्यामुळे त्यांनी मला पक्षात घेतले. तिथे मी निवडूनही आलो. पण मी तिथे रमलो नाही, अशी प्रांजळ कबुली सुनील देशमुख यांनी दिली.

157

९० च्या दशकात काँग्रेसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे वर्चस्व होते, त्यांच्यामुळे आमची तिकिटे कापली जायची, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा झाला आणि विदर्भातील फौजच निवडून आली, असा गौप्यस्फोट करत काँग्रेसमध्ये स्वगृही परतलेले माजी आमदार सुनील देशमुख यांनी नव्या चर्चेला सुरुवात केली. त्याचबरोबर मधल्या काळात आपण दिल्लीत जाऊन पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीतरी खोडा घातला, असे सांगत आजही काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण सुरु असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. 1999 पर्यंत काँग्रेसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे वर्चस्व होते, आपण कुणाचे नाव घेणार नाही. पण ते आम्हाला तिकीटच मिळू द्यायचे नाहीत. 1999ला काँग्रेमधून राष्ट्रवादी वेगळा झाला आणि एका झटक्यात आपण, अनिस अहमद, नाना पटोले आणि नितीन राऊत निवडून आलो, असा दावा देशमुख यांनी केला.

(हेही वाचा : पुण्यात विकेंड लॉकडाऊन! अजित पवारांची घोषणा )

राजकारण म्हणजे सापशिडी!

वयाच्या अवघ्या 25व्या वर्षीच काँग्रेसने आम्हाला आमदारकीचे तिकीट दिले. पण राजकारण हा सापशिडीचा खेळ आहे. कोण कधी वर जातो तर कधी खाली येतो. सहकार क्षेत्रात काँग्रेसची ताकद निर्माण झाली. तरीही आपल्याला 2009मध्ये तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर निवडणुकीला अपक्ष म्हणून उभा राहिलो. केवळ अडीच हजार मतांनी पडलो. त्यानंतरही मी कोणत्याच पक्षात गेलो नाही. उलट नवा पक्ष काढला. तसेच दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नही केले. पण कोणी तरी खोड घातला, त्यामुळे त्यात यश आले नाही, असेही ते म्हणाले.

भाजपमध्ये रमलो नाही!

2014मध्ये काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी मी पुन्हा प्रयत्न केला. हायकमांडला भेटलो. अहमद पटेल यांनी कामाला लागा म्हणून सांगितले, पण पुन्हा तिकीट कापले गेले. त्यानंतर भाजप नेते नितीन गडकरी यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध होते. त्यामुळे त्यांनी मला पक्षात घेतले. तिथे मी निवडूनही आलो. पण मी तिथे रमलो नाही, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.