उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊतांचे बंधू थेट दिल्लीला रवाना

143

एकीकडे गणेश विसर्जनाची लगबग सुरू असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अचानक संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना ‘मातोश्री’वर बोलावून घेतले. उद्धव ठाकरेंशी सुमारे तासभर चर्चा केल्यानंतर राऊत थेट दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

( हेही वाचा : संजय राऊतांचे बंधू अचानक ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरेंकडून बोलावणे )

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली आहे. जामीन न मिळाल्यामुळे १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात असणार आहे. त्यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. या सर्व घडामोडींत उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना अचानक मातोश्रीवर बोलावून घेतल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्यादिशेने वेधले गेले.

उद्धव ठाकरे यांनी सुनील राऊत यांच्या समोर दिल्लीतील भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी फोनद्वारे संपर्क साधला, त्यानंतर राऊत तातडीने दिल्लीला रवाना झाले. राजधानीत या नेत्यांची भेट घेऊन ते संजय राऊतांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार असल्याचे कळते. त्यामुळे गेली अडीच वर्षे भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या राऊत यांच्यासाठी भाजपचा कोण नेता आपले ‘राजकीय वजन’ वापरतो, त्यासाठी ठाकरे भाजपसोबत काय समझोता करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ठाकरेंकडून भाजप विरोधातील तलवार म्यान?

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात संजय राऊत सातत्याने भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करायचे. त्यामुळेच भाजप आणि शिवसेनेतील वितुष्ट वाढत गेले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन करीत भाजपने राऊत यांना हिसका दाखवला आणि ठाकरेंनाही इशारा दिला. पत्राचाळ प्रकल्पातील गैरव्यवहार उजेडात आणत ईडीने राऊत यांना अटक केली. त्यानंतर आता खुद्द ठाकरे भाजप विरोधातील तलवार म्यान करून राऊत यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. राज्यातील भाजपचा एक ‘ताकदवान’ नेता त्यांच्या मदतीला धावून आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.