म्हाडानंतर आता बी.जी.शिर्के कंपनी बांधणार महापालिका सफाई कामगारांची घरे

म्हाडाच्या मुंबई मंडळ आणि मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या १०६ वसाहतींच्या पुनर्विकासाची कामे ही याच कंपनीकडे होती.

म्हाडाची घरे बांधण्याचे कंत्राट मिळवणाऱ्या बी.जी. शिर्के यांनी आता मुंबई महापालिकेत प्रवेश केला आहे. माहिममधील महापालिकेची वसाहत असलेल्या प्रसिध्द अशा दादर कासारवाडी आणि प्रभादेवी येथील वसाहतींचा पुनर्विकास, आश्रय योजने अंतर्गत केला जात असून, या पुनर्विकासाचे काम बी.जी. शिर्के या कंपनीला मिळाले आहे. या दोन्ही ठिकाणी सध्या ४५९ सदनिका असून, पुनर्विकासामध्ये याठिकाणी एकूण १७७७ सदनिका बांधल्या जाणार आहेत.

अखेर कंत्राटदाराची नेमणूक

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थांनांच्या वसाहतींचा पुनर्विकास, आश्रय योजनेतंर्गत हाती घेण्यात आला आहे. मुंबईत ४६ सफाई कामगारांच्या वसाहती असून, त्यातील माहिमधील कासारवाडी आणि प्रभादेवी येथील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील सफाई कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा पहिला प्रयत्न या कासारवाडीमध्ये झाला होता, परंतु पुढे तो पुनर्विकास कागदावरच राहिला. याठिकाणी एक मजली आणि बैठ्या चाळींसह पाच मजली इमारतींचे सेवा निवासस्थान आहे. या पाच मजली इमारतीच्या घरांमध्ये पाणी गळतीची मोठी समस्या असून, अनेकांच्या घरांमध्ये यामुळे पावसाळ्यात पाणी गळत असते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून आश्रय योजनेंतर्गत याच्या पुनर्विकासाची चर्चा होती. परंतु अखेर याच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली.

(हेही वाचाः ‘त्या’ लसीकरणाच्या चौकशीसाठी महापालिकेची सिरमकडे धाव)

काम पूर्ण करण्यासाठी दिला कालावधी

डिझाईन आणि बिल्ट टर्नकी तत्वावर हे बांधकाम होणार असून, जमिनीचा ताबा दिल्यापासून पावसाळ्यासोबत २४ महिन्यांच्या कालावधीत हे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मेसर्स बी.जी. शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही पात्र ठरली आहे. प्रभादेवीतील वसाहतीत ३१ हजार ५६८ चौरस मीटरचे क्षेत्र आणि दादर कासारवाडीमध्ये ६६ हजार ४६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर हे बांधकाम केले जाणार आहे.

असा आहे खर्च

महापालिकेने ढोबळ अंदाजित बांधकाम क्षेत्र हे ५६ हजार ४८८ चौरस मीटर गृहीत धरुन त्यावर ३०० चौरस फुटाच्या १३९९ आणि ६०० चौरस फुटाच्या १४५ सदनिका प्रस्तावित केल्या होत्या. परंतु कंत्राटदार बी.जी. शिर्के यांनी बोली लावताना, ९८ हजार २९ चौरस मीटरच्या क्षेत्रावर ३०० चौरस फुटाच्या १५९७ सदनिका आणि ६०० चौरस फुटाच्या १८० सदनिका बांधून देण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे या बांधकामासाठी ३९५ कोटी आणि विविध करांसह ४७८.४७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

(हेही वाचाः अखेर शिवसेनेला ‘राजपुत्राकडून’च कार्यालयाचे लोकार्पण करुन घ्यावे लागले!)

म्हाडाच्या बांधकामाची जबाबदारी बी.जी.शिर्के कंपनीकडेच

या आश्रय योजनेंतर्गत काम मिळवणाऱ्या बी.जी. शिर्के या कंपनीने कोकण गृहनिर्माण मंडळ अंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी १७४९ व मध्यम उत्पन्न गटांसाठी १२३० सदनिकांचे बांधकाम विरार-बोळींज येथे केल्याच्या अनुभवाचा दाखला दिला आहे. परंतु म्हाडाच्या मुंबई मंडळ आणि मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या १०६ वसाहतींच्या पुनर्विकासाची कामे ही याच कंपनीकडे होती. म्हाडाच्या ५६ संक्रमण शिबिरांच्या इमारतींचे तसेच तेथील पुनर्विकासाचे कामही याच कंपनीकडे होते.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here