मुंबईतील सहा जागांपैकी दोन लोकसभा मतदार संघांच्या जागा शिवसेनेला (Shivsena) सोडल्या जाणार असल्या तरी दक्षिण मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने हा मतदार संघ भाजपने शिवसेनेला सोडण्याची तयारी दर्शवली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बदल्यात उत्तर पश्चिम हा मतदार संघ भाजपच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या विरोधातील वातावरण लक्षात घेता भाजपने या मतदार संघाची अदलाबदल करत दक्षिण मुंबई ऐवजी उत्तर पश्चिम मतदार संघ आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न भाजपचा असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसला मोठा धक्का बसला
काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात सलग दोन वेळा शिवसेना (Shivsena) उबाठा गटाचे अरविंद सावंत हे खासदार म्हणून निवडून आले असून त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्या आधी सन २००४ ते २०१४ या कालावधीत सलग दोन वेळा मिलिंद देवरा हे खासदार म्हणून निवडून आले होते. देवरा यांनी सन २००४ मध्ये भाजपच्या जयवंती बेन मेहता यांचा पराभव केला होता. त्यामुळे शिवसेना सोबत पुन्हा युती होताच भाजपने या दक्षिण मतदार संघावर आपला दावा करत कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभेचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांना मतदार संघाची बांधणी करण्याची जबाबदारी सोपवली होती. परंतु आता देवरा यांच्या शिवसेना (Shivsena) प्रवेशामुळे या मतदर संघात लोढा आणि नार्वेकर यांच्या पेक्षा देवरा हे सरस असल्याने ही जागा शिवसेनेला सोडण्याचा विचार केला जात आहे.
(हेही वाचा Rashmi Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे कुटुंब ॲक्शन मोडवर; रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?)
मतदार संघाच्या सर्वेक्षणात किर्तीकर यांच्या विरोधात जनमत
मात्र, या दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाच्या बदल्यात शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला जाणाऱ्या उत्तर पश्चिम मतदार संघाची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण मुंबईत देवरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे किर्तीकर यांचा पत्ता कापला जाणार असल्याचे बोलले जात आहे. उत्तर पश्चिम मतदार संघाचे खासदार गजानन किर्तीकर यांचे वाढते वय लक्षात घेता तसेच मतदार संघाच्या सर्वेक्षणात किर्तीकर यांच्या विरोधात जनमत दिसून आल्याने भाजपने हा मतदार संघ आपल्याकडे घेत प्रबळ उमेदवार देण्याचा विचार केला असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे तसे झाल्यास किर्तीकर हे आता शिवसेनेत (Shivsena) मार्गदर्शक भूमिकेत दिसतील असेही बोलले जात आहे. उबाठा गटाने या मतदार संघात किर्तीकर यांचे पुत्र अमोल यांचे नाव जाहीर केले असून भाजपकडून आमदार अमित साटम यांचे नाव चर्चेत असले तरी तरी प्रत्यक्षात या मतदार संघात ओळखीचा पण परिचित चेहरा दिला जावू शकतो, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाच वाटत आहे.
Join Our WhatsApp Community