मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळावा आणि औरंगाबाद येथील जाहीर सभेनंतर आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बीकेसी येथे 14 मे रोजी सभा होणार आहे. पण या जाहीर सभेवरुन आता पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटले आहे.
(हेही वाचा – शिवसेनेने चोरली राज ठाकरेंच्या सभेची गर्दी)
मनसेने दिला इशारा
राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्व स्वीकारत मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवावे अशी मागणी केली. या भूमिकेला भाजपानेही पाठिंबा दिला. मात्र सत्ताधारी शिवसेनेने भाजपा-मनसेवर नकली हिंदुत्वाचा आरोप केल्याचे समोर आले आहे. अशातच शिवसेनेकडून तयार करण्यात आलेल्या सभेच्या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील गर्दीची दृश्ये असल्याचा आरोप मनसेकडून केला गेला. त्यानंतर आता राज ठाकरेंना दिलेली हिंदुजननायक ही उपाधी देखील शिवसेनेने ढापल्याचा आरोप मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांच्यांकडून करण्यात येत आहे.
कीर्तिकुमार शिंदे यांचे ट्विट
दादू, तुमच्या घरच्या वारसाहक्काने चालत आलेल्या पदव्या बिनधास्त तुमच्या नावापुढे लिहा! वाघाचं कातडंही ढापा… पण राज साहेबांना महाराष्ट्रातील तसंच देशभरातील त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांनी आदरपूर्वक बहाल केलेली ‘हिंदूजननायक’ ही पदवी ढापण्याचा प्रयत्न कराल, तर याद राखा, असे ट्विट कीर्तिकुमार शिंदे यांनी केले आहे.
दादू,
तुमच्या घरच्या वारसाहक्काने चालत आलेल्या पदव्या बिनधास्त तुमच्या नावापुढे लिहा! वाघाचं कातडंही ढापा…पण @RajThackeray साहेबांना महाराष्ट्रातील तसंच देशभरातील त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांनी आदरपूर्वक बहाल केलेली 'हिंदूजननायक' ही पदवी ढापण्याचा प्रयत्न कराल, तर याद राखा. pic.twitter.com/xxBgAQNM3y
— कीर्तिकुमार शिंदे (@KirtikumrShinde) May 12, 2022
कोणी केली हिंदूजननायक उल्लेख करत पोस्ट?
शिवसंपर्क अभियान या नावाने शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची येत्या 14 मे रोजी मुंबईच्या बीकेसी मैदानात जाहीर सभा होणार आहे. यासभेपूर्वी पक्षाकडून आणि शिवसैनिकांकडून टीझर, पोस्टर्स मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे. मनसेच्या अनेक पोस्टर्सवर हिंदूजननायक म्हणून राज ठाकरेंना पुढे करण्यात आले असून त्यांना तशी पदवी दिल्याचे दिसले होते. मात्र आता शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हिंदूजननायक म्हणून उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून उद्धव ठाकरेंना हिंदूजननायक उल्लेख केला आहे.