माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर लेटरबॉम्बद्वारे खळबळजनक आरोप केला. या आरोपानंतर आता ठाकरे सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी चुप्पी साधली असून, ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपले फोन बंद ठेवणे पसंत केले आहेत.
या नेत्यांनी फोन ठेवले बंद!
‘हिंदुस्थान पोस्ट’च्या प्रतिनिधीने नवाब मलिक, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नाना पटोले, अनिल परब, मनिषा कायंदे, अतुल लोंढे, यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन नॉट रिचेबल’ आले आहेत. तर काही नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
(हेही वाचा : परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… गृहमंत्र्यांवर केले धक्कादायक आरोप!)
काय आहे नेमकं प्रकरण?
नुकत्याच मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन पायउतार झालेल्या परमबीर सिंग यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन प्रभारी सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी गेल्या काही महिन्यांत वारंवार बोलावून घेतले. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी गृहमंत्री आणि वाझे यांच्यात झाल्या. या भेटीत अनिल देशमुख यांनी वाझे यांना वसुली करण्याचे टार्गेट दिले होते. दर महिन्याला किमान १०० कोटी रुपये वसूल करुन द्यावेत असे देशमुखांनी वाझेंना सांगितले असल्याचे या पत्रात परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. मुंबईतील १ हजार ७५० बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येकी २ ते ३ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी वाझे यांना दिले असल्याचे, या पत्रात परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. त्यामुळे या मोठ्या गौप्यस्फोटाने गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत.
गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले!
परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी अशाप्रकारचे आरोप आपल्यावर केले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. तसेच मुकेश अंबानी प्रकरणाचे धागेदोरे हे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता असल्याने पुढील कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी हे आरोप परमबीर सिंग यांनी केले असल्याचे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.