डिनर डिप्लोमेसी हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेलच…त्यात राजकीय नेते बऱ्याचदा महत्वाची चर्चा करतात. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील दिल्लीमध्ये अशा डिनर डिप्लोमेसीचे आयोजन केले होते. मात्र सध्या राजकारणात डिनर नाही, तर फोन डिप्लोमेसी सुरू आहे काय, असे चित्र निर्माण झाले आहे. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दरम्यान त्यांना राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील इतर नेत्यांचे चौकशीसाठी फोन गेले. मात्र शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याची माहिती खुद्द शरद पवार यांनी ट्वीटद्वारे दिली. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे राज्यात ठाकरे सरकार जाण्याची वाट बघणाऱ्या भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांना पवारांची इतकी काळजी का वाटू लागली, असा प्रश्न या निमिताने निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांना मोदींचा विचारपूस करणारा फोन आला हे कळल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या काळजात धस्स झाले असेल इतके नक्की. गेल्या काही दिवसांतील घडामोडी बघता भाजप आणि राष्ट्रवादीतील जवळीकीची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
(हेही वाचा : सर्वसामांन्यांना त्रास झाला तर आम्ही खपवून घेणार नाही… काय म्हणाले दरेकर?)
मिसेस मुख्यमंत्र्यांचीही फोन करून विचारपूस!
सगळ्यात महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची देखील विचारपूस केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना फोन करून विचारपूस केली.
…तर ममतांचे एकजुटीसाठी देशभरातील नेत्यांना पत्र!
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून विचारपूस करत असताना दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच ममतांनी देशातील सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना पत्र लिहिले आहे. नायब राज्यपालांचे अधिकार वाढविणारे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (सुधारणा) विधेयक नुकतेच संसदेत संमत करण्यात आले आहे. ही अत्यंत गंभीर घडामोड आहे, असा उल्लेख ममतांनी या पत्रात केला आहे. या विधेयकाने केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या दिल्ली सरकारचे अधिकार काढून घेऊन ते नायब राज्यपालांच्या हातात दिले आहेत. त्यामुळे दिल्लीचे ते अघोषित प्रमुख झाले असून, गृहमंत्री व पंतप्रधान यांचे प्रतिनिधी म्हणून ते कारभार चालवतील, अशी भीती ममतांनी व्यक्त केली आहे. हे तीन पानी पत्र त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, द्रमुकचे स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव यांना पाठविले आहे.
Join Our WhatsApp Community