मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसून त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कारभार चालवत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी राष्ट्रवादीने एक फोटो ट्विट केला होता. प्रत्युत्तरादाखल शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतील एक फोटो शेअर करीत सवाल उपस्थित केले. मात्र, हा फोटो मॉर्फ केलेला असल्याचे उघड झाल्यानंतर समाजमाध्यमांतून म्हात्रेंवर जोरदार टीका होऊ लागली आहे.
( हेही वाचा : चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी CBI ची मोठी कारवाई! देशात ५६ ठिकाणी छापे )
खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले आहेत, असा फोटो राष्ट्रवादीचे पदाधिकारी रविकांत वरपे यांनी शुक्रवारी ट्विट केला. शिवाय ‘श्रीकांत शिंदे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा’, असा खोचक टोलाही लगावला. हा फोटो समाजमाध्यमांत सर्वदूर झाल्यानंतर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचा आरोप खोडून काढला. त्यानंतर या वादावर पडदा पडला असतानाच, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट करीत पुन्हा वाद ओढवून घेतला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून बैठक घेत आहेत. त्यांच्या बाजूला तत्कालीन मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि राजेश टोपे बसल्याचे म्हात्रेंनी ट्विट केलेल्या फोटोत दिसत आहेत. ‘हा फोटो बघा, कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय?’ असा प्रश्नही म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
सायबर सेलकडे तक्रार
राष्ट्रवादीने मात्र हा फोटो मॉर्फ केलेला असल्याचे म्हटले असून, त्या बैठकीचा मूळ फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शीतल म्हात्रेंविरोधात आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादीने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. चुकीचा फोटो प्रसारित केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शीतल म्हात्रे म्हणतात…
सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो मी शेअर केला. त्यांनी तक्रार केल्यामुळे सारे काही पोलीस तपासात उघड होईल. पण राष्ट्रवादीने शुक्रवारी श्रीकांत शिंदे यांचा मॉर्फ केलेला फोटो प्रसारित केला. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही बदनामी झाली. यासंदर्भात राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी. माझ्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीविषयी वकिलांचा सल्ला घेईन, असे शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community