‘शिवबंधन’नंतर शिव’बॉण्ड’; जिल्हाप्रमुखांवर शिवसेनेने दिली जबाबदारी

154
हातात भगव्या रंगाचे शिवबंधन हीच शिवसैनिकाची ओळख. लहानात लहान कार्यकर्त्याने शिवसेनेत प्रवेश केला की सर्वात आधी त्याच्या हातावर हे शिवबंधन बांधले जाते. पण एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासून पक्ष संघटना आणि पक्षाची निशाणी हातातून निसटत चालल्याने आता उरल्या-सुरल्या पदाधिकाऱ्यांकडून शपथपत्र (बॉण्ड) लिहून घेण्याचे निर्देश पक्ष प्रमुखांनी दिले आहेत. राज्यभरातील जिल्हाप्रमुखांवर ही शिव’बॉण्ड’ मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

तळागाळातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात

एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर पक्षात फुटीचे सत्र सुरू झाले आहे. नाराज शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात सहभागी होऊ लागले आहेत. त्यात खासदारांच्याही नाराजीची कुरबूर कानावर येऊ लागल्याने सावध झालेल्या उद्धव ठाकरे यांनी संभाव्य फूट थोपवण्यासाठी तळागाळातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत कायदेशीर पेच उद्भवल्यास संघटना आपल्या पाठिशी आहे, हे कागदोपत्री सिद्ध करण्यासाठी त्यांनी शिव’बॉण्ड’ मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर आपण शिवसेनेतच असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे लिहून घेतले जात आहे. शनिवारी मातोश्रीवर पार पडलेल्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत त्यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी देण्यात आली.

बॉण्डपेपरची मागणी वाढली

शिवसेनेचे शाखाप्रमुख, गटप्रमुख, सह गटप्रमुख, विभाग प्रमुखांसह अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून शिव’बॉण्ड’ लिहून घेतले जात आहे. राज्यभरातील या पदाधिकाऱ्यांची संख्या काही हजारांच्या घरात असल्यामुळे सध्या शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरची मागणी वाढली आहे.

शपथपत्रातील मजकूर असा…

‘माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वावर अढळ निष्ठा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून, त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. आणि या निष्ठेची पुनश्चः पुष्टी करीत आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन, याची या प्रतिज्ञापत्राद्वारे ग्वाही देत आहे. प्रतिज्ञापत्रातील मजकूर सत्य आणि बरोबर आहे. त्यातील कोणतीही माहिती असत्य नाही. तसेच कोणतीही सत्यस्थिती लपविण्यात आलेली नाही.’
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.