संजय राऊत यांना सक्त वसूली संचालयाने (ईडी) अटक केल्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील, असे दावे केले जात होते. परंतु, सुनील राऊत यांचे विक्रोळी-भांडुपमधील कार्यकर्ते वगळता इतर शिवसैनिकांनी पाठ फिरवली. शिवाय महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनीही मवाळ भूमिका घेतल्याने उद्धवसेनेचा पुरता भ्रमनिरास झाला.
म्हणून राष्ट्रवादीवाले सावध झाले
राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने मैदानात उतरण्याची तयारी केली होती. ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्याचे त्यांचे नियोजन होते. परंतु अध्यक्ष शरद पवार यांनी राऊतांबद्दल प्रतिक्रिया देणे टाळल्यामुळे कार्यकर्तेही सावध झाले. श्रेष्ठींचे आदेश येण्याची त्यांनी वाट पाहिली. पण मिटकरी वगळता, अजित पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांनी मवाळ भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांनी पक्षाचा सूर ओळखला आणि माघार घेतली. राज्य काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनीही माध्यमांत प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त अन्य पर्यायांचा अवलंब न केल्याने उद्धवसेना एकटी पडल्याचे दिसून आले.
(हेही वाचा आता काही सेकंदात सिनेमा होणार डाऊनलोड, काय आहेत 5G इंटरनेटची वैशिष्ट्ये?)
भावनिक राजकारण करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले
दुसरीकडे शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची अपेक्षा उद्धवसेनेला होती. पण विक्रोळी-भांडुपमधील शे-दोनशे कार्यकर्ते वगळता इतर कोणत्याही विभागातील शिवसैनिक राऊतांचे निवासस्थान वा ईडी कार्यालयाबाहेर धडकले नाहीत. खुद्द पक्षप्रमुख राऊत कुटुंबियांना भेटायला आले असतानाही, तिकडे कार्यकर्त्यांची फारशी गर्दी जमली नाही. त्यामुळे राऊत यांच्या अटकेवरून राज्यात भावनिक राजकारण करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले, अशी चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात सुरू होती.
Join Our WhatsApp Community