शिवसेना उतरली, बाप आणि हेडमास्तरवर…

153

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट फुटल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पायउतार व्हावे. शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करत शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार स्थापन केले. या शिवसेना शिंदे गटामध्ये मुंबईतील पाच आमदारांसह काही शिवसेनेचे माजी नगरसेवक व पदाधिकारीही सामील झाले. तेव्हापासून मुंबईतील शिंदे गटातील पदाधिकारी हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या रडारवर होते. त्यामुळे शिवसैनिकांचा खरा बाणा दाखवण्याचा निर्धार करणाऱ्या शिवसेनेने दादरपासूनच शिंदे गटाला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. दादरमध्ये ऍक्शनमोडमध्ये दिसणारी शिवसेना आता मुंबईतील अनेक भागांमध्ये शिंदे गटांविरोधात आक्रमक दिसणार असून भविष्यात शिवसैनिक आणि शिंदे गटांमध्ये रस्त्यांवरील लढाई होण्याची भीती वर्तवली जात आहे.

( हेही वाचा : शिवसेनेच्या राडेबाजीमुळे दसरा मेळाव्याच्या अडचणी वाढल्या! )

दादरच्या राडेबाजीनंतर, शिवसेना आणि शिंदे गटांमध्ये सोशल मिडियावरून जोरदार टोलेबाजी सुरु आहे. या राडेबाजीनंतर शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांनी आपल्या फेसबूक वर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबतचा शिवसैनिकांचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर आमच्यावर ना आमदाराचा हात आहे, ना खासदाराचा. . पण ज्याचा हात आहे, तो सगळयांचा बाप आहे,असे म्हटले आहे. तर सदा सरवणकर यांच्या समर्थकांनीही आपण ज्या शाळेत शिकलात त्या शाळेचे सरवणकर हे हेडमास्तर असल्याची पोस्ट टाकत शिवसेनेला इशारा दिला आहे.

दादरमधील शिवसेना आणि शिंदे गटाचे आमदार सरवणकर यांच्यातील राडेबाजीनंतर दोन्ही गटांमधील वातावरण तापले आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख असलेले महेश सावंत हे एकेकाळी सदा सरवणकर यांचे कटटर समर्थक होते आणि २००९मध्ये जेव्हा या दादर माहिम विधानसभा क्षेत्रातून आदेश बांदेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती, तेव्हा सदा सरवणकर यांनी प्रथम शिवसेना सोडून नारायण राणे यांच्या मध्यस्थीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आणि काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी सरवणकर यांच्यासोबत विद्यमान विभागप्रमुख महेश सावंत, विद्यमान शाखाप्रमुख अजित कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी गेले होते. परंतु निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काही वर्षांनी सदा सरवणकर आणि त्यांचे समर्थक शिवसेनेत परतले होते.

मात्र, शिंदे गटात सरवणकर गेल्यांनतर अजित कदम तसेच महेश सावंत गेले नाही. उलट सदा सरवणकर यांच्याविरोधात त्यांना उभे करून विभागप्रमुखाची माळ शिवसेनेने गळ्यात घातली. त्यामुळे आजवर शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या महेश सावंत यांना पक्षात चांगले पद मिळाले तरी या पदाला न्याय देण्या इतपत त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता नाही. त्यामुळे ज्या प्रभादेवीमध्ये त्यांनी राडा केला, तीच घटना जर धारावी,माहिम किंवा वडाळ्यात घडली असती तर या विभागप्रमुखाने तिकडे लक्षही दिले नसते,असे काही स्थानिक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाणी वाटपाच्या स्टॉलवरून आदित्य ठाकरेंना समाधान सरवणकर यांनी म्यॅव म्यॅव म्हणून हिणवले असल्याचा आरोप होत होता. याबाबत समाधान सरवणकर यांनी फेसबूकवरून यांचा खुलासा करत स्पष्टीकरण दिले आहे. ज्यामुळे समाधान सरवणकर म्हणतात, “म्याव म्याव” हे स्वतःच्या राजकारणासाठी दादरमधील एक पदाधिकारी व महिला नेत्या वापरत आहेत.

तुमच्या या राजकारणातून निदान आदित्यना तरी वगळा, तुमचे उद्दीष्ट माझी बदनामी आहे की आदित्यची? हे सर्वांनाच माहित आहे की, जे तिकडे सुरू होते ते आदित्यसाठी नव्हते. बोका, वाघ , खोका असे शब्द वापरुन घोषणा दिल्या जात होत्या, जाणीवपूर्वक चिथावणी देण्यासाठी सर्व केले जात होते. तुमच्या कृतीसोबत ‘आदित्य’ नाव लावल्यामुळे राजकारणात प्रसिद्धी अधिक मिळेल. परंतु या सर्व गोष्टींमुळे आदित्यची इमेज तुम्हीं खराब करत आहात. माझे व त्याचे संबंध नक्कीच चांगले होते, मी त्यांच्यावर बोलणार नाही. हा प्रसंग वेगळा आहे, विनाकारण त्यांचे नाव का खेचता? जे त्या प्रसंगी उपस्थित नव्हते, त्यांच्यासाठी थोडक्यात जे घडले ते सांगत आहे… बाकी तुमचे राजकारण सुरु राहु द्या, त्याला आमच्या कामांनी उत्तर देण्यास आम्हीं समर्थ आहोत,असे पोस्टमध्ये म्हणत ते म्यॅव… म्यॅव.. आदित्यसाठी नसून केवळ त्यावेळी ज्या घोषणा दिल्या जात होत्या त्यावर प्रत्युत्तर म्हणून दिले जात होत. त्यात आदित्यचे नाव घुसडून केवळ प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे समाधान सरवणकर यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.