सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा केवळ एका मताने पराभव झाल्यामुळे शिंदे समर्थकांनी आक्रमक होऊन थेट राष्ट्रवादी कार्यालयावरच दगडफेक केली. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदेंचा पराभव झाला असा आरोप करत, शिंदे समर्थकांनी संतापून राग व्यक्त केला. दरम्यान, शशिकांत शिंदेंनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे.
आमदार शिंदेंचा पराभव
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागून आमदार शशिकांत शिंदेंचा एका मताने पराभव झाला आहे. शिंदे यांना २४ मते मिळाली, तर ज्ञानदेव रांजणे यांना २५ मते मिळून त्यांनी बाजी मारली आहे. या पराभवामुळे संतापलेल्या शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत, दगडफेक केली. कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
( हेही वाचा : लाचखोरीच्या ६ हजार तक्रारी, केवळ २१३ प्रकरणांवर चौकशी )
गैरप्रकारबद्दल दिलगिरी व्यक्त
घडलेल्या प्रकाराबद्दल शशिकांत शिंदेंनी दिलगिरी व्यक्त करत, कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यकर्ते भावनावश होऊन असे प्रकार करतात, शरद पवारांप्रती माझी कायम निष्ठा असणार आहे, असे मत शशिकांत शिंदेंनी व्यक्त केले आहे. तसेच घडलेल्या प्रकारवर ते २५ नोव्हेंबरला अधिक सविस्तरपणे भाष्य करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community