शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यात बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला दोन्ही मैदानात मोठी गर्दी पाहायला मिळाली. साधारण पोलिसांच्या अंदाजानुसार, शिंदे गटाच्या मेळाव्यात साधारण १ लाख २५ हजारांच्या आसपास लोकांची गर्दी होती तर ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात सुमारे ६५ हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. यावेळी जोरदार फटकेबाजी करण्यात आली. या भव्य मेळाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन केला आणि पोलिसांचे आभार मानले.
(हेही वाचा – मुलांना ‘हे’ कफ सिरप देताय? भारतीय बनावटीच्या सिरपमुळे तब्बल 66 बालकांचा मृत्यू)
दसरा मेळाव्याच्या दिवशी प्रचंड ताण असूनही मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना मुख्यमंत्री शिंदेंनी फोन करून संपू्र्ण पोलीस दलाचे आभार मानल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच काल शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा पार पडला.
Join Our WhatsApp Community