- खास प्रतिनिधी
लोकसभा, विधानसभेनंतर राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते मुंबई महापालिका निवडणुकांचे. भाजपाने बुधवारी २५ डिसेंबर २०२४ या दिवशी मुंबई कोअर कमिटीची बैठक घेतली तर शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही गुरुवार २६ डिसेंबर पासून विधानसभानिहाय मतदारसंघांचा आढावा घेण्याचे नियोजन केले आहे. (BMC Election)
आढावा बैठक
मुंबई भाजपा अध्यक्ष आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विभागीय भाजपा कार्यालयात मुंबईतील नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी करावयाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला तसेच पुढे जबाबदारीचे वाटप करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
बैठकीला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी खासदार गोपाल शेट्टी, अमित साटम, मनीषा चौधरी, प्रवीण दरेकर, संजय उपाध्याय, मिहिर कोटेचा आदी आमदार उपस्थित होते तर आमदार अतुल भातखळकर, पराग अळवणी व माजी आमदार सुनील राणे हे विविध कारणांनी उपस्थित राहू शकले नाहीत. (BMC Election)
(हेही वाचा – Vulture Migration : ताडोबातील गिधाड ४००० किमीचे अंतर पार करत पोहोचले तामिळनाडूत)
सभासद नोंदणी अभियान
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे, विविध कार्यक्रम आयोजित करणे, नवीन मतदार नोंदणी करणे आणि महत्वाचे सभासद नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणावर राबवणे असा कार्यक्रम सध्या आखण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. (BMC Election)
ठाकरेंच्याही बैठका
उद्धव ठाकरे यांनीही विधानसभा पराभवानंतर मुंबईसाठी कंबर कसली असून बैठका घेण्यावर भर दिला आहे. २६ ते २९ डिसेंबर असे तीन दिवस विधानसभानिहाय बैठका घेतल्या जाणार असून मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत. यासंदर्भात मुंबईतील निरीक्षकांची बैठक नुकतीच पार पडली. (BMC Election)
महापालिका निवडणूक स्वबळावर
मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून नव्हे तर स्वबळावर लढावी, असे पदाधिकाऱ्यांचे मत आहे. या विषयावरही सर्व शाखांना भेटी देणार तेव्हा शाखाप्रमुखांशी, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे समजते. या बैठकीसाठी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत.
शिवसेना (शिंदे) पक्षाच्याही आढावा बैठका सुरू झाल्या असून लवकरच पुढील बैठकांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे शिवसेना सुत्रांकडून सांगण्यात आले. (BMC Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community