एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून गदारोळ सुरू असताना, या घडामोडींत काँग्रेस आमदाराने साधले आहे. सत्ता बदलानंतर जत तालुक्यातील १४३ कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. या भागाचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी ही स्थगिती उठवली आहे.
(हेही वाचा – ‘तोंड आवरा, पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये’, शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याचा राऊतांना थेट इशारा)
आमदार सावंत यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अपर मुख्य सचिव नंदकुमार उपस्थित होते. विक्रम सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देत जतकरांची व्यथा सांगितली. १४३ कोटींची विकासकामे मंजूर झाली आहेत; पण स्थगिती असल्याने ही कामे अडली असल्याचे सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगताच मुख्यमंत्र्यांनी या सर्व कामांवरील स्थगिती उठवण्याचे आदेश दिले.
विस्तारित म्हैसाळ योजना कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावणार असून येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला तांत्रिक मंजुरी व निधीबाबत ठोस निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आमदार सावंत यांना सांगितले.
सीमाभागांत नवे उद्योग सुरू होणार
– जत, सनमडी, मायथळ व मोरबगी येथे नवीन उद्योग सुरू करण्याबाबतही मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे.
– अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींचा फायदा जत तालुक्याला होत नाही. त्यामुळे ५ एकरची अट शिथिल करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
– या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अपर मुख्य सचिव नंदकुमार यांना बोलावून घेत दुष्काळी, सीमाभाग, अवर्षण भागातील शेतकऱ्यांसाठी ही अट शिथिल करता येते का? याचा अभ्यास करून तत्काळ अहवाल सादर करावा, असा आदेश दिला.