शिवसेनेच्या ३९ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्यानंतर पक्ष संघटनेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. शिंदे गटाने आपली शिवसेनेचा अधिकृत असल्याचा दावा केल्याने उध्दव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेबाबत प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे शिवसेना कुणाची यावरून वाद निर्माण झालेला असताना आता लढा न्यायमंदिरापर्यंत पोहोचला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदेशीर लढाईच्या दृष्टीकोनातूनच आता उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने हाती शिवबंधन असले तरीही आपल्या पक्षाच्या घटनेतील प्रमुख पदापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. परंतु हे प्रतिज्ञापत्र केवळ भविष्यात अधिकृत शिवसेना कुणाची यावरून पुरावे म्हणून सादर करण्यासाठीच हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडून बाँड लिहून घेतले जात असल्याचे बोलले जात आहे.
पक्षाचे अस्तित्व कायम टिकवण्यासाठी धावपळ
शिवसेनेतून बंड पुकारत एकनाथ शिंदे यांनी एक स्वतंत्र गट स्थापन करत आपल्याकडेच सर्वाधिक लोकप्रतिनिधी असल्याने आपलीच शिवसेना अधिकृत असा दावा केला आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेनेचा विधीमंडळाचे प्रतोद म्हणून भारत गोगावले यांना नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर करत शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी व प्रतोद सुनील प्रभू यांची निवड रद्द केली. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदार व काही खासदारांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर दावा सांगताच उध्दव ठाकरे यांनीही आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम टिकवण्यासाठी धावपळ केली.
(हेही वाचा – Maharashtra Assembly session: अजित पवारांनी घेतली फडणवीसांची खुर्ची!)
प्रतिज्ञापत्रके सेना भवनमध्ये सादर करण्याचे निर्देश
शिवसेनेत यापूर्वी पाच रुपये स्वीकारुन शिवसैनिकांची नोंदणी केली जायची. परंतु मागील काही वर्षांपूर्वी शिवसैनिकांची ओळख पटवण्यासाठी प्रत्येकाच्या हाती शिवबंधन बांधण्यात आले. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश देताना प्रत्येकाच्या हाती शिवबंधनच बांधल जायचे. परंतु शिंदे यांच्यासह आमदारांच्या गटाने केलेल्या बंडखोरीनंतर ठाकरेंची शिवसेनेच्या अस्तित्व धोक्यात आल्याने त्यांनी संघटनेतील नेत्यांपासून ते उपशाखाप्रमुख पदांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांकडून एक निष्ठतेचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यास सुरुवात केली. शाखाशाखांमधून छपाई केलेल्या प्रतिज्ञापत्रकातील आपले नाव व हुद्दा लिहून त्यावर स्वाक्षरी करत ही प्रतिज्ञापत्रके शिवसेना भवनमध्ये सादर करण्याचे निर्देश होते, त्यानुसार शनिवारी व रविवारी मोठ्याप्रमाणात प्रतिज्ञापत्र संबंधित पदाधिकाऱ्यांनी शिवसेना भवनमध्ये सादर केली.
शिवसेना कुणाची, ठाकरे-शिंदे गटात वाद
शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून घेतली जाणारी ही प्रतिज्ञापत्रके ही केवळ ठाकरेंकडील शिवसेना वाचवण्यासाठी महत्वाची ठरणारी आहे. शिवसेना कुणाची यावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून वाद सुरु असून भविष्यात हे प्रकरण न्यायालयात गेल्यास तिथे लेखी पुराव्यांना अधिक महत्व असते. त्यामुळे आमदार, खासदार तसेच नगरसेवक सोडून गेले तरीही पक्षातील पदाधिकारी हे महत्वाचे असतात. त्यामुळे शिवसेना नेता ते उपशाखाप्रमुख पर्यंतच्या पदाधिकाऱ्यांकडून ही प्रतिज्ञापत्रके स्वाक्षरी करून एकप्रकारे लेखी दस्तावेज जमा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात हे प्रकरण न्यायालयात गेल्यास हाच लेखी दस्तावेज सादर करून ठाकरे आपली शिवसेनाच अधिकृत आहे असा दावा करू शकते आणि दाव्याला हे लेखी दस्तावेज सबळ पुरावे म्हणून सादर केले जावू शकतात. त्यामुळे शिवसैनिकांच्या निष्ठेवर शंका नसली तरी पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्याकडून लेखी प्रतिज्ञापत्र लिहून घेणे आवश्यक असल्यानेच ती शिवसैनिकांकडून घेण्यात आल्याचे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community