ठाण्यातील अनधिकृत फेरीवाल्याकडून महापालिका अधिकाऱ्यावर केलेला जीवघेणा हल्ला आणि साकीनाका येथे एका महिलेवर पाशवी बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला. या सर्व घटनांनंतर आता अन्य राज्यांतून आलेले नागरिक हे राज्य सरकारच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे अन्य राज्यांतून आलेल्या नागरिकांच्या सविस्तर नोंदी ठेवण्याचा आदेश मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिला आहे.
राज्यातील महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आयोजित गृह विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. पोलिस महासंचालक कार्यालयात झालेल्या या बैठकीस गृहमंत्री वळसे – पाटील यांच्यासह राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा : धक्कादायक! वीज महावितरण होणार बंद?)
रिक्षांच्या नोंदी स्थानिक पोलिस ठाण्यात होणार!
अन्य राज्यांतून मुंबईत आलेले नागरिक कुठून आले आणि कुठे राहतात, याचा सविस्तर तपशील ठेवावा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच बरेच गुन्हे हे रिक्षांमधून घडतात, हे दिसून आले आहे. त्यामुळे रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतराला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत.
शक्ती कायद्यावर नागपूर अधिवेशनात चर्चा
जलदगती न्यायालयांच्या माध्यमातून प्रकरणांचा निकाल लवकरात लवकर लागावा, तसेच त्यामध्ये शिक्षा होईल, याबाबतही प्रय़त्न करावेत. शक्ती कायद्याचे प्रारूप विधानसभेत मांडण्यात आले आहेत. कायदा परिपूर्ण होण्यासाठी विधीमंडळाची संयुक्त समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात येत आहेत. या समितीचा अहवाल आगामी हिवाळी अधिवेशनात सादर करणार असल्याचेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. याशिवाय जलदगती न्यायालयांकडे प्रलंबित प्रकरणांची वर्गवारी करून, त्यांचा वरीष्ठ अधिकाऱ्यांना सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Join Our WhatsApp Community