बाळासाहेब तुमचेच कसे?

137

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांचा गट फुटल्यानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून उठलेला वाद आता बाळासाहेब कुणाचे इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. शिवसेना कुणाची यावर वाद होऊ शकतो. पण बाळासाहेब कुणाचे यावरून होणारा वाद हा तर तमाम शिवसैनिक आणि आणि बाळासाहेबांवर नितांत प्रेम करणाऱ्या तमाम जनतेचा अपमान आहे. बाळासाहेब ही व्यक्ती नाही तर तो विचार होता. तो विचार प्रत्येक मनामनात रुजवला गेला. हे काम बाळासाहेबांनी केले. त्यामुळे बाळासाहेबांचे स्थान प्रत्येकाच्या ह्दयात आहे. त्या ह्दयाच्या कप्प्यातून बाळासाहेबांचे विचार बाजूला केले जाऊ शकत नाहीत. त्यातूनच शिवसेनेतील शिंदे गटाचा उदय झाला आहे, हे मान्य करायला हवे.

( हेही वाचा : NIA ची देशभरात मोठी कारवाई! ISIS कनेक्शन प्रकरणी महाराष्ट्रात कोल्हापूर-नांदेडमध्ये छापे)

मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे हे सातत्याने प्रसार माध्यमांशी बोलतांना तसेच जाहीर संवादांमध्ये बोलतांना, हिंमत असेल तर माझ्या वडिलांचे, बाळासाहेबांचे नाव आणि त्यांचा फोटो वापरु नका, तुमच्या आई वडिलांच्या नावाने मते मागा, असे आव्हान शिंदे गटाला आणि पर्यायाने इतरांनाही देत आहेत. खरे तर हे असे आव्हान करत एकप्रकारे उद्धव ठाकरे हे आपल्या वडिलांचे अर्थात बाळासाहेबांचे महत्त्वच कमी करत आहेत.

दैवताचे नाव घेताना उद्धव ठाकरेंना विचारण्याची गरज नाही

मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा अंगारा पेटत ठेवण्याचे काम बाळासाहेबांनी करताना जे पालकत्व त्यांनी स्वीकारले होते, ते विसरुन कसे चालेल. जो शिवसैनिक बाळासाहेबांबद्दल अपशब्द काढला तरी समोरच्याच्या श्रीमुखात लगावण्यास मागे पुढे धजावत नव्हता. बाळासाहेबांना आपली मान कापून द्यायलाही जीवावर उदार झाला होता, नव्हेतर बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आमचे रक्त भगवे आहे असे सांगत हाताची नसही कापून भळाभळा रक्त सांडवत होता, त्या शिवसैनिकांना आपण कसे सांगणार की ते फक्त माझेच वडील आहेत म्हणून? आज शिवसैनिक नसता, त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी व्यक्ती नसती, तर बाळासाहेब घडले नसते. लाखो अनुयायांच्या प्रेमावर बाळासाहेब नावाचे वादळ अंथरुणाला खिळेपर्यंत आणि आजही मृत्यूपश्चात घोंघावत आहे.

बाळासाहेब हा विचारच नव्हता तर तमाम हिंदुंचे दैवत होते. या दैवताचे नाव घेताना उद्धव ठाकरेंना विचारण्याची गरज नाही, असे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. यात चुकीचे काय आहे? शिवसेना आज जी काही उभी आहे, ती अशाच नारायण राणे यांच्यासारख्या कडवट शिवसैनिकांच्या जोरावर. पुढे त्यांनी पक्ष सोडला आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तरी बाळासाहेबांवरील त्यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. आजही बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक सक्रीय नसले तरीही ते बाळासाहेबांच्या प्रेमापोटी मतदानाला उतरुन धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर बटन दाबून ते प्रेम व्यक्त करताना दिसतात.

संकुचित बुद्धीची कीव करावीशी वाटते

आज बाळासाहेबांचे नाव वापरू नका असे सांगितले जात आहे, यात नुकसान ते कोणाचे आहे? मुळात शिवसेना ही मुंबईत बाळासाहेबांनी वाढवली. पण मुंबई बाहेर त्यांचे विचार पुढे नेत या शिवसेनेची पाळेमुळे मजबूत करण्याचे काम हे शिवसैनिकांनी केले आहे. आज शिवसेनेच्या राजगादीवर बसलेल्या उद्धव ठाकरे यांना याची कदाचित जाणीव नसावी आणि तशी असती तर त्यांनी बाळासाहेबांचे नाव न लावता आपल्या बापाचे नाव लावून मते मागा असे सांगितले नसते. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटालाच हे आव्हान दिले नसून काही वर्षांपूर्वी शिवसेनेतून फुटून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणाऱ्या राज ठाकरे यांनाही दिले आहे. राज ठाकरे यांनाही या माध्यमातून हाच संदेश दिलेला आहे. बंडखोर लोक माझ्याच वडिलांचे नाव वापरत आहेत. पण मी भविष्यात हे नाव त्यांना वापरु देणार नाही, असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरु नका असे जर राजघराण्यातील वंशजांनी म्हटले तर काय म्हणायचे मग? घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कुणी वापरु नये असे जर आंबेडकर कुटुंबीयांनी म्हटले तर?,… अशी अनेक उदाहरणे देता येतील. कारण ही जी काही थोर मंडळी होऊन गेली आहेत, त्यांनी या देशाला सर्वस्व अर्पण केले आहे. त्यावर कोणा एका कुटुंबाला हक्क सांगता येत नाही, ती राष्ट्रीय संपत्ती आहे. उद्धव ठाकरे यांनी इतिहासाची पाने चाळून पहावीत, त्यात बाळासाहेब हे राष्ट्रपुरुषांच्या यादीत आहेत. त्यांची जयंती व पुण्यतिथी ही राष्ट्रीय स्तरावर केली जाते. जर बाळासाहेब राष्ट्रपुरुष आहेत, तर मग बाळासाहेबांचे नाव लावू नका असे सांगण्याचा अधिकार उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला नाही, हे त्यांनी विसरु नये.

बाळासाहेब हे राष्ट्रपुरुष असल्याने त्यांच्या स्मारकासाठी मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान असलेल्या जागेचा वापर केला जात आहे. बाळासाहेब ही जर खासगी मालमत्ता असतील तर मग महापौरांच्या निवासस्थानाची जागा स्मारकाला का दिली? यावर शासकीय तिजोरीतून खर्च का केला जातो मग? त्यामुळे बाळासाहेब जर केवळ उद्धव ठाकरे यांचे वडील असतील तर त्यांनी त्यांचे स्मारक मातोश्री निवासस्थानी उभारायला हवे होते. स्मारकाच्या उभारणीसाठी स्वत:चा पैसा खर्च करायला हवा होता. त्यामुळे जेव्हा लाभ घ्यायचा तेव्हा राष्ट्रपुरुष म्हणून सांगत सुटायचे आणि त्यांचे नाव वापरले तर आपले वडिल म्हणून सांगायचे या उद्धव ठाकरे यांच्या संकुचित बुद्धीची कीव करावीशी वाटते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.