उद्धव ठाकरेंनंतर आता मुख्यमंत्री शिंदेंची सर्वोच्च न्यायालयात धाव, काय केली मागणी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची असा वाद निर्माण झाला असतानाच, एकनाथ शिंदे यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने केलेली याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी या नव्या याचिकेतून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे खरी शिवसेना कोणाची याचा निकाल लावण्यात यावा, अशी मागणीही या याचिकेद्वारे शिंदे गटाने केली आहे.

अशा संस्थांना अर्थ काय?

शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या बाबत निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय घेऊ नये, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तर 15 आमदार 39 आमदारांना बंडखोर म्हणू शकत नाहीत. तसेच पक्षाला अधिकृत मान्यता आणि निवडणूक चिन्हाचा मुद्दा हा निवडणूक आयोगाच्या कक्षेत येतो. त्यामुळे अशाप्रकारे सर्वच पक्ष जर सर्वोच्च न्यायालयात जाऊ लागले तर अशा संस्थांना अर्थ काय, असेही शिंदे गटाने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

(हेही वाचाः संजय राऊतांच्या ED अटकेचे पडसाद दोन्ही सभागृहावर, कामकाज तहकूब)

आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असेही सादर करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेसाठी शिंदे गट आणि भाजपला दिलेल्या आमंत्रणाच्या विरोधातही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here