मागील आठ महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी कपाटात बंद ठेवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात बरीच तेढ निर्माण झाली. अखेर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमधील प्रमुख मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. तब्बल ५० मिनिटांची चर्चा झाली. या बैठकीत राज्यातील विविध समस्यांवर चर्चा झाली, तसेच राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवर लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली, पण राज्यपालांनी यावेळी कोणताही ठोस शब्द दिला नाही.
राज्यातील विविध विषयांवर केली चर्चा! – अजित पवार
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, आम्ही राज्यपाल यांच्याशी राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली. तसेच या चर्चेत आम्ही राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीचाही विषय काढला, ही यादी बराच काळ प्रलंबित आहे. त्यामुळे यावर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. त्यांनीही यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपण यावर आपली भूमिका मांडली आहे, त्यामुळे आपण यावर निर्णय घेऊ, असेही अजित पवार म्हणाले. राज्यात पावसाची काय परिस्थिती आहे, कोरोनाची काय स्थिती आहे, यांची माहिती दिली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. दरम्यान सध्या ईडीकडून महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर कारवाई केली जात आहे, त्याविषयावर चर्चा केली नाही, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा : अखेर राज्यपाल देणार भेट! ‘तो’ तिढा सुटणार का?)