मागील दोन वर्षांमधील कोविडच्या आजारांच्या निर्बंधामुळे दहिहंडीचा उत्सव मोठ्याप्रमाणात साजरा होऊ शकला नाही. परंतु यंदा प्रथमच कोविड निर्बंधमुक्त गोविंदाचा सण साजरा करतानाच फुटलेल्या शिवसेनेनेला पुन्हा शाखाशाखांमधील नवचैतन्य वाढवण्यासाठी दहिहंडी बांधण्याचे आदेश शिवसेना पक्षाकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील शाखांबाहेर निष्ठेच्या हंड्या फोडण्यासाठी उत्साहाचे थर चढले जाणार आहे. नोटबंदी आणि गोविंदा पथकांच्या थरांच्या उंचीवरील मर्यादा यामुळे शिवसेना शाखांबाहेरील लावण्यात येणाऱ्या हंड्या बंद झाल्या असल्या तरी महापालिका निवडणूक आणि पक्षातील अस्थिरता यामुळे हंड्या लावून एकप्रकारे शक्तीप्रदर्शन आणि शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य जागवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरे करून मतदारांवर प्रभाव टाकण्याची संधी धावून आल्याने भाजप मुंबईत ३७० ठिकाणी दहिहंडी बांधण्यात येणार आहे. आमदार ऍड आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग वरळी विधानसभेतील जांबोरी मैदानात हंडी बांधून फुंकले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईभर बांधण्यात येणाऱ्या या ३७० हंड्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वासोबत नवचैतन्य निर्माण करणारे आहे.
भाजपने मुंबईत २२७ प्रभागांमध्ये ३७० दहिहंडी बांधून पक्षाच्या बांधणीला आणि निवडणूक कामाला सुरुवात केल्याने शिवेनेनेनेही आपल्या सर्व शाखांबाहेर हंडी बांधण्याच्या सूचना केल्या आहे. शिवसेनेच्या शाखांबाहेर यापूर्वीपासून हंडी बांधण्यात येत असल्या तरी नोटबंदी नंतर या हंड्या बांधण्याचे प्रमाण कमी झाले होते. मागील अनेक वर्षांपासून शिवसेना शाखांच्यावतीने हंड्या बांधण्यात येत नव्हत्या. त्यातच कोविड निर्बंधामुळे मागील दोन वर्षांत दहिहंडींचे आयोजन करण्यात आले नव्हते. परंतु मागील काही महिन्यांपूर्वी शिवसेनेततून शिंदे गट फुटल्यानंतर शिवसेना पक्षांत अस्थिरता पसरली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये निष्ठेची वज्रमुठ बांधून पुन्हा त्यांच्या नवचैतन्य आणण्याची संधी असल्याने मुंबईतील प्रत्येक शाखेच्यावतीने आता दहिहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या गोपाळकाल्यात राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या हंड्या फुटल्या जाणार असून संपूर्ण मुंबईत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये हंड्या बांधण्याची चढाओढ पहायला मिळणार आहे.
शिवसेना भवनसमोर निष्ठा हंडी
दादर शिवसेना भवनसमोर आजवर विद्यार्थी सेना आणि त्यानंतर युवा सेनेच्यावतीने दहीहंडीचे आयाजन केले जायचे. परंतु मागील काही वर्षांपासून याठिकाणी हंडीचे आयोजन होऊ शकले नसले तरी यंदा मात्र शिवसेना भवनसमोरील राम गणेश गडकरी चौकात युवा सेनेच्या वतीने निष्ठा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते रात्रौ ८ वाजेपर्यंत या हंडीचे आयोजन केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community