केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा धमकींचा फोन

113

काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन त्यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात आला होता. गुन्हेगार जयेश पुजारी याने बेळगावच्या तुरुंगातून हा धमकीचा फोन केल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा मंगळवारी सकाळी नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकी फोन आल्याची माहिती मिळत आहे. या धमकीच्या फोननंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दोनदा नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळील नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात हे धमकीचे फोन आले आहेत. या फोनवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या धमकीच्या फोननंतर नागपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. अद्याप अस्पष्ट आहे की, गुन्हेगार जयेश पुजारींनेच गडकरींना पुन्हा धमकीचे फोन केले आहेत का? त्याने कुठून फोन केले? बेळगावाच्या तुरुंगातूनच फोन केलेत का? याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. तसेच पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

दरम्यान १४ जानेवारीला नितीन गडकरींच्या नागपूरमधील याच जनसंपर्क कार्यालयात तीन वेळा धमकीचे फोन आले होते. यावेळी त्या फोनमध्ये दाऊद असा शब्द उच्चारण्यात आला होता. खंडणीची मागणी करण्याचा आशय त्या फोनमध्ये होता. जर खंडणी दिली नाही, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारू, अशी धमकी फोनद्वारे देण्यात आल्याची माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली होती.

(हेही वाचा – नरेंद्र मोदी २०२४ला पराभूत होणार का? काय म्हणाले गडकरी?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.