मंत्री, आमदार, खासदार आणि नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेला नाहक बदनामी सहन करावी लागत आहे. त्यामुळे या वाचाळवीरांना लगाम घालण्यासाठी शिंदे गट संस्कार वर्ग घेणार असल्याचे कळते.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केल्याने बाळासाहेबांच्या शिवसेनेला एक पाऊल मागे येत दिलगिरी व्यक्त करावी लागली. या प्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलीच, शिवाय मित्रपक्षांनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
(हेही वाचा – दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार! रश्मी ठाकरेंवर केले गंभीर आरोप, म्हणाल्या, ‘अंधारे चिल्लर आहेत, पण…’)
त्यानुसार, शिंदे गटातील मंत्री, आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बेताल वक्तव्यांना लगाम घालण्यासाठी संस्कार शिबिर घेतले जाणार आहे. त्यासाठी उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची निवड करण्यात आली आहे. आपल्यावरील जबाबदारी आणि भाषेचा वापर यासंर्दभात या शिबिरात प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली नाराजी
– कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची अलिकडची काही वक्तव्ये शिंदे गटाला अडचणीत आणणारी ठरली आहेत.
– नवे सरकार अस्तित्त्वात आल्यापासूनच अशी वक्तव्ये करणाऱ्यांची यादी मोठी आहे. त्यात तानाजी सावंत, संजय शिरसाट, संतोष बांगर, शहाजीबापू पाटील, चिमणराव पाटील, किशोर अप्पा पाटील यांचा समावेश आहे.
– हे सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असले, तरी त्यांच्या वक्तव्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याने भाजप अस्वस्थ आहे.
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतची नाराजी शिंदे यांच्यासमोर उघडपणे व्यक्त केल्याने हे संस्कार शिबिर घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.