ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यात ठिकठिकाणी सावंत यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर आता ठाण्याचे रिक्षावालेही रस्त्यावर उतरले आहेत. अरविंद सावंत सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्मला आलेत का, असा सवाल रिक्षावाल्यांकडून केला जात आहे.
रिक्षावाले आंदोलक म्हणाले की, खरंतर अरविंद सावंतचं डोकं फिरलंय. त्यांनी जे काही वक्तव्य केलं की, एका रिक्षावाल्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काँग्रेसचे दिग्गज, राष्ट्रवादीचे दिग्गज, आजीमाजी मुख्यमंत्री काम करतील का? अशाप्रकारचे जे वक्तव्य केले, ते माथेफिरुने केलेल्या वक्तव्यासारखे आहे. एक रिक्षावाला हा त्यांचा व्यवसाय होता. रिक्षा चालवून ते कुटुंबाचा प्रपंच करत होते. ही काही चुकू झाली का? अरविंद सावंत सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्मला आलेत का?
अरविंद सावंत नक्की काय म्हणाले होते?
२०१९मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचेच नाव दिले होते. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर पवारांनी उद्धव ठाकरे तुम्हीच मुख्यमंत्रीपद सांभाळा असे सांगितले, असे अरविंद सावंत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले. त्यांच्या निषेध केला जाऊ लागला. त्यानंतर अरविंद सावंत यांनी यु-टर्न घेऊन या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? हे मी म्हणालो होतो. शरद पवार म्हणाले नव्हते, असे स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community