पुढचा गुढीपाडवा हा आमच्या विजयाचा गुढीपाडवा असेल, आमचेच सरकार येणार, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर बोलत असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राऊतांना टोला लगावत चांगलाच समाचार घेतला. राऊतांचा नातू जरी आला तरी त्यांचे सरकार येणार नाही, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
बुधवारी नंदुरबार तालुक्यातील गारपीटग्रस्त भागातील नुकसानीच्या पाहणीसाठी अब्दुल सत्तार गेले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, संजय राऊत जे बोलतात ते जीवनात खरं झालाय का? जे आमच्या मतावर निवडून गेले, तेच आमच्यावर भाष्य करतात. त्यांच्यात हिंमत असेल तर दादा भुसे यांचे आव्हान स्वीकारावे आणि पुन्हा निवडून दाखवावे. राऊत यांनी राजीनामा दिला नाही तर दोन-चार पिढ्या यांचे सरकार येणार नाही. राऊत यांचा नातू जरी आला तरी त्यांचे सरकार येणार नाही.
पुढे सत्तार म्हणाले की, राऊतांना दादा भुसेंनी दिलेल्या आव्हानामुळे मिरची लागत आहे. आता बोटावर मोजण्याइतक्या आमदार-खासदारांचे राऊत नेते आहेत. त्यांनी विचारपूर्वक बोलावे अन्यथा आम्हीही बोलू शकतो, राऊत यांनी ज्यांचे नमक खाल्ले त्यांची तरी जाण ठेवावी.
(हेही वाचा – शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांची हकालपट्टी; गजानन किर्तीकरांची नियुक्ती)
Join Our WhatsApp Community