Manik Kokate Controversy : कृषिमंत्री कोकाटे पुन्हा एकदा केकाटले!

97
Manik Kokate Controversy : कृषिमंत्री कोकाटे पुन्हा एकदा केकाटले!
  • खास प्रतिनिधी

कृषिमंत्री माणिक कोकाटे पुन्हा एकदा केकाटले. आता तरी अजित पवार कोकाटे यांचे केकाटणे बंद करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकाऱ्यांकडून विचारला जात आहे.

तिसऱ्या वेळी मंत्रिपद बदलू

मुंबईत मंगळवारी ८ एप्रिल २०२५ या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाध्यक्ष म्हणून अजित पवार यांनी मार्गदर्शन केले तसेच काही वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना, विशेषतः माणिक कोकाटे, दमही भरला. मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य एकदा-दोनदा झाले तर समजून घेता येईल, पण तिसऱ्या वेळी झाले तर मंत्रिपद बदलू,” असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. (Manik Kokate Controversy)

(हेही वाचा – मंगेशकर कुटुंबावर टीका क्लेशदायक व लांच्छनास्पद; खासदार Sunil Tatkare यांची तीव्र प्रतिक्रिया)

…तर कांद्याचे बाजारभाव पडणारच

कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी गुरुवारी १० एप्रिल २०२५ या दिवशी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सुनावले. “एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावातून दोन-पाच हजार रुपये फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही काही मर्यादा आहेत. दुप्पट तिप्पट ठीक आहे, पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच,” असा तर्क कोकाटे यांनी लावला आणि शेतकऱ्यांना सुनावले. यामुळे शेतकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

विम्याच्या पैशातून साखरपुडा, लग्न

कोकाटे यांची शेतकऱ्यांना दुखावणारे वक्तव्य करण्याची ही तिसरी वेळ आहे. माणिक कोकाटे यांनी यापूर्वीही दोनवेळा शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. ‘कर्ज घ्यायचे आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचे नाही. मला एक सांगा, कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. तुम्हाला पाईप लाईनला, जलसिंचनाला, शेततळ्याला पैसे, सगळ्या गोष्टींना पैसे. त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का?” असे सांगून ते पुढे म्हणाले, “सरकार भांडवली गुंतवणूक करते. शेतकरी करतो का? शेतकरी, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करतात,” असे वक्तव्य कोकाटे यांनी केले. (Manik Kokate Controversy)

(हेही वाचा – सावरकरप्रेमी Ramesh Dange यांचे निधन)

भिकारीसुद्धा रुपया घेत नाही

त्यापूर्वीही कोकाटे यांनी शेतकऱ्यांची मने दुखावली आहेत. “हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेलाही गैरव्यवहाराची ग्रहण लागले पण योजना बंद करायची नाही, सुधारणा कराव्या लागतील,” असे वादग्रस्त वक्तव्य कोकाटे यांनी केल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

प्रत्येक विधानानंतर दिलगिरी

मात्र या प्रत्येक विधानानंतर कोकाटे यांनी यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही म्हणून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अजित पवार यांनीही मंत्र्यांना झापल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, कारवाई मात्र झाली नाही. (Manik Kokate Controversy)

(हेही वाचा – BMC : हवामानाच्या अंदाजानुसार अतिवृष्टीची शक्यता, त्या-त्या वेळी अधिकारी कार्यस्थळी हजर हवेत; आयुक्तांच्या सूचना)

नुकसानीचा आढावा

राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री कोकाटे यांनी पाहणी दौरा सुरू केला आहे. (Manik Kokate Controversy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.