राज्यात गेल्या आठवड्यापासून सत्ता संघर्ष चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी सरकारविरोधात भूमिका घेतल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी गुरूवारी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार उद्या बहुमत चाचणी अर्थात फ्लोअर टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या ठाकरे सरकारला सभागृहात आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
काय झाली फडणवीस-राज ठाकरेंमध्ये चर्चा?
या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हलचालींना वेग आला असून बहुमतासाठी मॅजिक फिगर गाठण्यासाठी मतांची जुळवा-जुळव करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. फोनवरून झालेल्या या चर्चेत फडणवीस यांनी राज ठाकरे यांना मनसेची ताकद भाजपच्या पाठिशी उभी करण्याची विनंती केली आहे. फडणवीसांनी केलेल्या या विनंतीला राज ठाकरे यांनी होकार दिला आहे.
(हेही वाचा – “जेव्हा वेळ येईल तेव्हा चुना लावू”, गुलाबराव पाटलांचे राऊतांना चोख प्रत्युत्तर )
आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडीला मतदान करू नये, असे फडणवीस यांनी राज ठाकरे यांना सांगितल्याचे समजते आहे. फडणवीसांनी केलेल्या या विनंतीला राज ठाकरे यांनी होकार दिला आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील उद्या भाजपला मतदान करणार असल्याचे सांगितले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील भाजपचे सर्व आमदार आता देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे, ठाकरे सरकारने सायंकाळी ५ वाजताच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात फ्लोर टेस्टची सुनावणी होणार आहे. फ्लोर टेस्ट होण्यापूर्वी मुंबईत काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू असून, त्यात त्यांच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.
Join Our WhatsApp Community