एसटीच्या २८व्या कर्मचा-याची आत्महत्या!

शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

146

राज्य परिवहन महामंडळाच्या एका चालकाने शुक्रवारी सकाळीच आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागच्या बाजुला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. आतापर्यंतची महामंडळातील २८ व्या कर्मचा-याची ही आत्महत्या आहे.

आर्थिक विवंचनेतून केली आत्महत्या

शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते चालक म्हणून येथील आगारात कार्यरत होते. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक दृष्ट्या आढळून येत आहे. या आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच आगाराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी तिथे धाव घेतली. पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास करत आहेत.उपमुळे पुन्हा एकदा एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक समस्येचा विषय चर्चेला आला आहे.

शेवगाव येथे एका एसटी करचाऱ्याने एसटीच्या मागे जाऊन आत्महत्या केली, ही अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक बाब आहे. गेल्या वर्षभरात केवळ पगार वेळेत मिळत नाही म्हणून अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्य सरकारचे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले धोरण अशा आत्महत्यांना कारणीभूत आहे. एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू सांगता आणि दुसरीकडे एसटी कर्मचारी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करत आहेत. राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे अन्यथा आगडोंब उसळेल आणि त्याला जबाबदार राज्य सरकार असेल.
– प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते

(हेही वाचा : महापौर, आयुक्तांना पुरस्कारासाठी वेळ, पण सानुग्रह अनुदानावरील निर्णयासाठी नाही!)

आत्महत्यांचे सत्र थांबणार कधी?

याआधीच अनियमित वेतनामुळे त्रस्त उमरगा आगाराचे वाहक दयानंद गवळी यांनी मंगळवारी, १२ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. ७ मार्च २०२० रोजी महामंडळामध्ये पहिली आत्महत्या झाली होती. हे आत्महत्येचे सत्र आजही सुरूच आहे. १९ महिन्यांपासून शुक्रवारी २८ वी आत्महत्या झाली आहे. अहमदपूर, तेल्हारा, शहादा, कंधार आणि साक्री अशा अनेक ठिकाणी एस.टी. कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी गेल्यावर्षी सुद्धा जळगाव येथे वाहक मनोज चौधरी आणि रत्नागिरी येथे पांडुरंग गडदे या एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.