आता पद मिळवण्यासाठी शायरी यायला हवी का? काँग्रेस नेत्याचा थेट सोनिया गांधींना सवाल

185

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक आता चांगलीच चुरशीची झाली आहे. येत्या 10 जून रोजी राज्यातील राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी मतदान होणार असून, सर्व पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. पण काँग्रेसने या निवडणुकीसाठी दिलेल्या उमेदवारामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आता चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे.

काँग्रेसने थेट उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असतानाच, आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली खदखद व्यक्त केली आहे.

(हेही वाचाः प्रतापगढीला राज्यसभेची उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी)

शायरीत काय खुबी आहे?

मुरादाबाद मधून तब्बल सहा लाख मतांनी हरणा-या इम्रान प्रतापगढी यांना अल्पसंख्यांक विभागाचं राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आलं. त्यांनी आजवर एकही नगरपालिका निवडणूक सुद्धा जिंकलेली नाही. तरी त्यांना आता थेट राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. एका व्यक्तीवर पक्ष एवढी मेहरबानी का करत आहे?, त्यांच्या शायरीत अशी काय खुबी आहे ज्यामुळे अन्य योग्य नेत्यांच्या कर्तृत्वाचा पक्षाला विसर पडला?, असे सवाल करणारे पत्र राय यांनी सोनिया गांधी यांना लिहिले आहे.

शायरी येणं गरजेचं आहे का?

याआधी देखील पक्ष नेतृत्वाकडून नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर पंजाबच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते देखील प्रतापगढी यांच्याप्रमाणे शायरी करत होते. त्यामुळे पक्षात एखादं पद मिळवण्यासाठी शायरी येणं गरजेचं आहे का, असा खोचक सवालही राय यांनी आपल्या पत्रातून केला आहे. महाविकास आघाडीमध्ये आधीच काँग्रेसचे नेते अपमानित होत आहेत. असे असतानाच आता पक्ष नेतृत्वही त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याची खंत त्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

(हेही वाचाः या नेत्यांना दिला महिलांनी दे धक्का!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.