एकीकडे उद्योग राज्याबाहेर चालल्याने सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली असताना, आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे कार्यालय मुंबईहून दिल्लीला स्थलांतरित करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. त्यामुळे महाविद्यालयासाठी लागणाऱ्या परवानग्या, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्राच्या दुरुस्तीसाठी दिल्लीला खेटे मारावे लागणार आहेत.
तंत्रशिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी संसदेच्या निर्देशांनुसार प्रत्येक राज्यात आणि प्रमुख शहरांमध्ये तंत्रशिक्षण परिषदेचे विभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत चर्चगेट येथे १९८७ मध्ये हे कार्यालय सुरू झाले. महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांची संख्या वाढू लागल्याने प्रशासकीय कामकाजासाठी येथील जागा कमी पडू लागल्यामुळे हे कार्यालय पवईत स्थलांतरित करण्यात आले. आता यूजीसीच्या नव्या अध्यक्षांकडे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचाही कार्यभार सोपवण्यात आल्याने हे कार्यालय आता दिल्लीला स्थलांतरित करण्याचा निर्णय या नव्या अध्यक्षांनी घेतल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
(हेही वाचा शिवरायांवरील बेगडी प्रेम दाखवू नका, महाराजांचे नाव घेणे बंद करा! उदयनराजे यांनी मांडल्या भावना)
दिल्लीला गेल्यास अडचण काय?
- राज्यातील १ हजार ५०० तंत्र महाविद्यालये या कार्यालयाशी जोडली गेली आहेत.
- या सर्व महाविद्यालयांना आता प्रशासकीय कामकाजासाठी थेट दिल्लीला फेऱ्या माराव्या लागतील.
- नवीन महाविद्यालयांसाठी परवानग्या तसेच विद्यार्थ्याच्या गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्राच्या दुरुस्तीसाठीही दिल्ली गाठावी लागेल.