एका बाजूला महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला ‘इंडी’ आघाडीत समाविष्ट करून घेण्यात यावे, अशी मागणी करत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी थेट लोकसभेसाठीच्या जागांचे वाटपही करून टाकले. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि वंचित यांना प्रत्येकी १२ जागा वितरित करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर लागलीच एकेकाळीचे वंचितचे सहकारी असलेल्या एमआयएम (AIMIM) पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनीही एमआयएमला देशपातळीवरील विरोधी पक्षाच्या ‘इंडी’ आघाडीत स्थान देण्यासाठी काँग्रेसकडे प्रस्ताव दिला. त्यांनी काँग्रेसला हा दुसऱ्यांदा प्रस्ताव दिला असून, “आजच्या घडीला एमआयएम (AIMIM) पक्ष महाराष्ट्रात काँग्रेसपेक्षा मोठा” असल्याचा दावा देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी केला.
काँग्रेस चांगल्या परिस्थितीत नाही
“खरं तर काँग्रेसनेच स्वतः आज आम्हाला विचारणा करायला हवी की आम्ही एमआयएमसोबत येऊ का? कारण आज काँग्रेसची अशी परिस्थिती नाही की थाटामाटात बसाल आणि इम्तियाज तुमच्या दरबारात येईल,” असे जलील म्हणाले.
(हेही वाचा BJP : भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जानेवारीमध्ये)
महाराष्ट्रात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष
काँग्रेसला सुनावताना ते पुढे म्हणाले, “काँग्रेसची परिस्थिती आज महाराष्ट्रात काय आहे? तर शून्य खासदार आहेत. आमचा किमान एक तरी खासदार लोकसभेत आहे. त्यामुळे लोकसभेचा विचार करता महाराष्ट्रात आमचा पक्ष काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनीच आम्हाला प्रस्ताव द्यायला हवा होता.”
इम्तियाज यांनी एमआयएम सोडावा
दरम्यान, उबाठा गटाने एमआयएमला (AIMIM) इंडी आघाडीत स्थान देण्यास कडाडून विरोध केला असून इम्तियाज यांनी एमआयएम पक्षत्याग करुन आघाडीत सहभागी व्हावे, असा सल्ला उबाठा गटाचे अंबादास दानवे यांनी दिला. ते म्हणाले, “इम्तियाज यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करावा तर त्यांना इंडी आघाडीत स्थान मिळेल.”
Join Our WhatsApp Community