नरिमन पॉईंटमध्ये ऐन मोक्याच्या जागी उभी असलेली एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली आणि मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला देण्याची विनंती केली.
( हेही वाचा : सानुग्रह अनुदानाची घोषणा : २० दिवस उलटत आले तरी महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईना रक्कम )
सध्या मंत्रालय आणि अॅनेक्स इमारत मिळून सुद्धा शासकीय कार्यालयांसाठी जागा अपुरी पडते, त्यामुळे या इमारतीची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र दरम्यानच्या काळात तो प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर आम्ही पुन्हा पत्रव्यवहार केला. सध्या रिझर्व्ह बँक आणि महाराष्ट्र सरकार अशा दोघांनी या जागेची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारला प्राधान्य देण्याची मागणी मान्य केली आहे. आता केंद्र सरकारचे अधिकारी आणि आमचे मुख्य सचिव यासंदर्भात पुढील चर्चा करतील आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मान्यतेने पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी ४८७ कोटी
नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण यासाठीचा ४८७ कोटी रुपयांचा कार्यादेश जारी करण्यात आला आहे. या कार्यादेशाची प्रत रेल्वेमंत्र्यांनी आज दिली. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर अनेक चांगल्या प्रवासी सुविधा उपलब्ध होणार असून, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी मिळणार आहेत. याभागातील सामाजिक-आर्थिक विकासाला सुद्धा यामुळे चालना मिळेल. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत होतो, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community