Ajit Pawar : अजित पवार गटाचा ग्रामीण महाराष्ट्रावर ‘फोकस’; कारण काय?

विविध विभागातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आता दर मंगळवारी पक्ष कार्यालयात आमदारांची बैठक आयोजित केली जाणार आहे

137
Ajit Pawar : अजित पवार गटाचा ग्रामीण महाराष्ट्रावर 'फोकस'; कारण काय?
Ajit Pawar : अजित पवार गटाचा ग्रामीण महाराष्ट्रावर 'फोकस'; कारण काय?
मुंबई : राज्याचे सत्ताकेंद्र हळूहळू खेड्यांकडून शहरांकडे सरकत असले, तरी ग्रामीण महाराष्ट्राचा मतदार हा दर निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावत असतो. त्यामुळे या मतदाराला बांधून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाने विशेष रणनीती आखली असून, त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राकडे आपला ‘फोकस’ वळवला आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने त्यांना तशी सूचना केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोहोचलेली आहेत. मात्र, अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार पुरता संभ्रमावस्थेत आहे. ‘काका’ की ‘दादा’, असा तो संभ्रम. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीआधी हा संभ्रम दूर करून ग्रामीण मतदाराला आपल्याकडे ओढण्यासाठी अजित पवार गटाने विशेष रणनीती आखली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागातील विकासावर लक्ष केंद्रित केले असून, विविध विभागातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आता दर मंगळवारी पक्ष कार्यालयात आमदारांची बैठक आयोजित केली जाणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने राष्ट्रवादीला ग्रामीण महाराष्ट्रावर फोकस करण्याची सूचना केली आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते ग्रामीण भागात प्रभावी कामगिरी करू शकले, तर महायुतीच्या विजयाची वाट सोपी होईल, असा केंद्रीय नेतृत्त्वाला विश्वास आहे. त्यामुळे अजित पवार गटाने हा निर्णय घेतला आहे.

९ मंत्र्यांना जिल्हे दिले वाटून
– राज्यभरात आपली ताकद वाढवण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) गटाने आपल्या सर्व ९ मंत्र्यांसह राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्हयांची जबाबदारी सोपवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूर, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगरची जबाबदारी देण्यात आली आहे.
– दिलीप वळसे पाटील यांच्यावर अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा, हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदूर्ग, व अहमदनगर, धनंजय मुंडे यांच्यावर बीड, परभणी, नांदेड, व जालना, संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली, लातूर, व उस्मानाबाद, अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर, अनिल पाटील यांच्यावर जळगाव, धुळे, व नंदुरबार, धर्मारावबाबा आत्राम यांच्यावर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्हयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे नेते त्यांना दिलेल्या जिल्ह्यांत जाऊन पक्षविस्तार करणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.