Ajit Pawar : अजित पवारांच्या गटाने शरद पवारांची घेतली भेट; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

153

शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देऊन मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी, १६ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. अचानक झालेल्या शपथविधीनंतर जवळपास १५ दिवसांनी ही मंडळी शरद पवार यांच्या भेटीसाठी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि पक्ष एकसंध राहावा म्हणून मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यासाठी आपण त्यांच्या भेटीला आलो होतो, असे अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

या घडामोडींवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला या भेटीची कल्पना नाही, पण त्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही. शरद पवार हे त्यांचे वर्षानुवर्षे नेते राहिलेले आहेत. त्यामुळे या भेटीत मला काही वावगं आहे असं वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार गटासोबत असलेले ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, आज आम्ही आमचे आदरणीय नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री आणि इतर आमदार यशवंतराव चव्हाण सेंटरला आले होते, असे म्हटले.

(हेही वाचा NDA चे आता शक्तीप्रदर्शन; १८ जुलै रोजी ‘हे’ पक्ष येणार बैठकीला )

शरद पवार हे इथे आल्याचे समजल्यावर आम्ही याठिकाणी आलो. त्यांची भेट घेतली. आमच्या सर्वांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर आहे. पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहू शकतो, यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावं, अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. मात्र त्यांनी यावरह कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.