राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना जाहीररीत्या फटकारल्या नंतर पार्थ पवार प्रचंड नाराज असून, आत्या सुप्रिया सुळे देखील त्यांची समजूत काढण्यात अपयशी ठरल्या आहेत. याचमुळे पार्थ पवार यांची समजूत काढण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब बारामतीमध्ये जाण्याची शक्यता आहे. पार्थ पवार हे पुण्यामध्ये असून, ते उद्या वडील अजित पवार यांच्यासोबत बारामतीला जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आजोबांवर पार्थची नाराजी कायम
आजोबा शरद पवार यांनी जाहीररीत्या फटकारल्यामुळे नातू पार्थ पवार दुखावे असून, त्यांची नाराजी कायम आहे. त्यामुळे ते काही वेगळा निर्णय घेतात का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाली आहे. दरम्यान याच चर्चेनंतर आता शनिवारी बारामती मध्ये अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या घरी पवार कुटुंबाची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
मुलाला फटकारल्याने सुनेत्रा पवारही नाराज
पार्थ पवार यांना आजोबा शरद पवार यांनी जाहीररीत्या फटकारल्यानंतर पार्थ यांच्या आई आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील कमालीच्या नाराज असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांनी देखील पवारांसमोर पार्थला फटकारल्याबद्दल नाराजी बोलून दाखवली. दरम्यान माजी मंत्री आणि शरद पवारांचे जवळचे नातेवाईक पद्मसिंह पाटील यांच्या नातवानेही फेसबुक पोस्ट लिहून पार्थ यांचं कौतुक केलं होतं. आपण उस्मानाबादचे आहोत, कसं लढायचं हे आपल्याला माहित आहे. तुम्ही जन्मापासूनच योद्धे आहात, हे मी लहानपणीपासूनच पाहत आलोय, असे म्हणत मल्हार पाटील यांनी पार्थ यांचं समर्थन केलं आहे. मल्हार पाटील हे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र आहेत ज्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. माजी खासदार पद्मसिंह पाटलांची बहिण ही अजित पवारांची पत्नी आहे. त्यामुळे पार्थ भाजपामध्ये प्रवेश करणार का? असे तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.
शरद पवार काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.
Join Our WhatsApp Communityपार्थ पवारांचा विषय हा कौटुंबिक आहे. त्याबाबत शरद पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं आहे. कौटुंबिक विषयावर राजकारण होतं आहे
रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस