पालकमंत्री पदाबाबत तोडगा निघत नसल्याने शिंदे-फडणवीसांनी १५ ऑगस्टला ध्वजारोहणासाठी तात्पुरती सोय लावून दिली होती. मात्र, अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतल्याने ध्वजारोहणासाठी काढलेले परिपत्रक बदलण्याची वेळ ओढवली आहे.
१५ ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करेल, याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी सकाळी एक परिपत्रक जारी केले होते. देवेंद्र फडणवीस नागपूर, अजित पवार कोल्हापूर, छगन भुजबळ अमरावती, दिलीप वळसे पाटील वाशीम, हसन मुश्रीफ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करतील, असे त्यात नमूद करण्यात आले होते. मात्र, पुण्याची जबाबदारी अजित पवारांऐवजी चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिल्याने त्यांनी या परिपत्रकावर तीव्र आक्षेप घेतला. शिवाय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांनाही त्यांच्या जिल्ह्यात ध्वजारोहणाची संधी न दिल्याने अजित पवार नाराज झाले.
त्यामुळे अजित पवारांची नाराजी दूर करण्यासाठी पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करीत हा तोडगा काढल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. नव्या परिपत्रकानुसार, मंत्रालय येथे आयोजित राज्याच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे येथे राज्यपाल रमेश बैस हे ध्वजारोहण करणार आहेत. तर, नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापूरला उपमुख्यमंत्री अजित पवार ध्वजारोहण करतील. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याऐवजी रायगडची जबाबदारी देण्यात आली आहे.
(हेही वाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आशा भोसले यांना ‘She-Shakti’ पुरस्कार)
कोण कुठे झेंडावंदन करणार?
- अमरावती – मंत्री छगन भुजबळ
- चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
- रायगड – चंद्रकांत पाटील
- वाशिम – दिलीप वळसे-पाटील
- अहमदनगर – राधाकृष्ण विखे-पाटील
- नाशिक – गिरीष महाजन
- धुळे – दादाजी भुसे
- जळगाव – गुलाबराव पाटील
- ठाणे – रवींद्र चव्हाण
- सोलापूर – हसन मुश्रीफ
- सिंधुदुर्ग – दीपक केसरकर
- रत्नागिरी – उदय सामंत
- परभणी – अतुल सावे
- औरंगाबाद – संदीपान भुमरे
- सांगली – सुरेश खाडे
- नंदुरबार – विजयकुमार गावीत
- उस्मानाबाद – तानाजी सावंत
- सातारा – शंभूराज देसाई
- जालना – अब्दुल सत्तार
- यवतमाळ -संजय राठोड
- बीड – धनंजय मुंडे
- गडचिरोली – धर्मराव अत्राम
- मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
- लातूर – संजय बनसोडे
- बुलढाणा – अनिल पाटील
- पालघर – अदिती तटकरे
- हिंगोली – जिल्हाधिकारी हिंगोली
- वर्धा – जिल्हाधिकारी वर्धा
- गोंदिया – जिल्हाधिकारी गोंदिया
- भंडारा – जिल्हाधिकारी भंडारा
- अकोला – जिल्हाधिकारी अकोला
- नांदेड – जिल्हाधिकारी नांदेड