Ajit Pawar बनले मौनी-बाबा, राजकीय भूकंपाचे संकेत

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता : पराभूतांची नाराजी, भाजपा-शिवसेना नेत्यांनी डिवचले

266
अजित पवार गटाचे अर्धे लोक Mahayuti मध्ये नाराज? बड्या नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ
  • सुजित महामुलकर

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ म्हणून ओळख असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ‘दादा’ या उपाधीला धक्का लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, अजितदादा यांची अवस्था महाभारतातील ‘अभिमन्यू’सारखी झाली आहे. चक्रव्यूहात जायचे कसे ते माहीत आहे पण बाहेर कसे पडायचे ते माहीत नव्हते तशी काहीशी अवस्था अजित पवार (Ajit Pawar) यांची झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

उपयुक्तता की उपद्रवमूल्य?

थोडक्यात सांगायचे तर ‘२०-२० क्रिकेटचा हंगाम’ सुरू झाला आणि पहिल्या तीन फलंदाजांपैकी एकाने आपला फॉर्म गमावला, अशी अवस्था विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांची झाली आहे. क्रिकेटमध्ये एकवेळ संघातील ११ खेळाडूंपैकी काहींनी उत्तम खेळी केली तरी सामना जिंकता येऊ शकतो, मात्र राजकारणात तुमची ‘उपयुक्तता’ किंवा उपद्रवमूल्य’ यावर नेत्याची किंमत आणि जागा ठरत असते. तसे नसते तर राजकारणात ‘आयाराम-गयाराम’ संस्कृती उदयास आलीच नसती. त्यामुळे ६४-वर्षीय दादांनी आपली उपयुक्तता’ किंवा उपद्रवमूल्य वाढवले तर त्यांना आणि पुढच्या पिढीला राजकीय भवितव्य आहे.

(हेही वाचा – आदित्य ठाकरे पुन्हा वरळीत उभे राहतात की घाबरून…, Shrikant Shinde यांचा खोचक टोला)

लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून चार जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने लढल्या आणि त्यातील केवळ एक उमेदवार निवडून आले. बारामती या आपल्या होम-पिचवरही दादांना पराभवाचा सामाना करावा लागला, हा सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे.

‘दादा’गिरी मोडीत

अजित पवार यांच्याशी थेट पंगा घ्यायचा तर विरोधी पक्षातले भले-भले नेतेही दहा वेळा विचार करीत. एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत पाडणार, असे जाहीर सांगून पाडल्याची उदाहरणे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून चवीने सांगतली जातात. मात्र, या लोकसभा निवडणुकीत चित्र बदलले. शरद पवार गटाचे अमोल कोल्हे असो वा नगरचे, आमदार निलेश लंके यांच्या विजयाने दादांची ‘दादागिरी’ मोडीत निघाल्याची चर्चा दबक्या आवाजात राष्ट्रवादीत होऊ लागली आहे.

(हेही वाचा – माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारणार, Eknath Shinde यांची ग्वाही)

भुजबळ नक्की कोणासोबत?

शरद पवार यांच्याविरोधात पक्षात बंड झाले आणि अजित पवार यांच्यासोबत बाहेर पडलेले त्यांचे सहकारी, ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ‘आपण दादांसोबत नाही तर राष्ट्रवादीसोबत आहोत’ असे विधान केले. भुजबळ यांची नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती मात्र तिकीट वेळेत दिले गेले नाही. त्यानंतर राज्यसभेवर एक जागा झाली तिथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांची वर्णी लावण्यात आली. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात आहे.

पराभूतांची नाराजी

लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या काही पराभूत उमेदवारांकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून युतीधर्म १०० टक्के पाळला गेला नसल्याच्या तक्रारी केल्या गेल्या. यात भर पडली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुखपत्र ‘द ऑर्गनायझर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातून. संघाचे ज्येष्ठ संशोधक रतन शारदा यांच्या लेखात ‘द ऑर्गनायझर’ने वादग्रस्त नेत्यासोबतच्या भाजपाच्या हातमिळवणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करून भाजपा अधिक चांगली कामगिरी करत असताना अजित पवार यांना सरकारमध्ये सामावून घेण्याची काय गरज होती? असा सूर या लेखात होता.

(हेही वाचा – Top 5 waterfalls : पावसाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ ५ धबधब्यांना नक्की भेट द्या!)

रामदास कदमांनी मीठ चोळले

या भळभळत्या जखमेवर मीठ चोळले गेले ते, बुधवारी शिंदे यांच्या शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात रामदास कदम यांच्या भाषणातील एका टिप्पणीने. ‘अजित पवार यांचा महायुतीतील प्रवेश लांबला असता तर बरे झाले असते,’ असे मत कदम यांनी जाहीर भाषणात केले आणि विषय आणखी चिघळला.

राजकीय तडजोड की तत्वांना मुरड?

अजित पवार यांनी आत्मचिंतन करून ‘राजकीय तडजोड’ आणि ‘पक्षाचे धोरण’ या दोन वेगळ्या गोष्टींची सांगड योग्य प्रकारे घातल्यास म्हणजे एकतर समविचारी पक्षांशी जुळवून अन्यथा तत्वांना मुरड घातल्यास त्यांना राजकीय स्थैर्य प्राप्त करता येऊ शकेल. उदाहरणार्थ, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कॉंग्रेसशी ‘हात’मिळवणी केली आणि हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर, मराठी माणूस, परप्रांतीय असे शिवसेनेची खरी ओळख असलेली तत्वे बासनात गुंडाळून कॉंग्रेसमध्ये एकरूप झालेच, पण कॉंग्रेसची भाषाही बोलू लागले. त्याचा लाभ नुकताच लोकसभा निवडणुकीत झाला. मराठी मते गेली तरी मुस्लिम एकगठ्ठा मते मिळाली आणि उबाठा पक्ष तरला. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अद्याप महायुतीशी अंतर राखून असल्याने ‘न घर का, न घाट का’ अशी स्थिती पक्षाची झाली आहे आणि लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर आले. त्यामुळे त्यांनी एकतर महायुतीतून बाहेर पडावे किंवा भाजपा-सेनेशी एकरूप होऊन वाटचाल करावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

मौन ही राजकीय भूकंपाची नांदी

एकूणच अजित पवार यांनी काकांची साथ सोडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे राजकीय गणिताची जुळवाजुळव करण्यात अपयश आल्याची भावना अजित पवार यांच्या गोटात व्यक्त केली जात आहे. तसेच गेले आठवडाभर सुरू असलेल्या या चर्चेत अजित पवार यांनी पूर्ण मौन बाळगले असल्याने त्यांचे मौन ही मोठ्या ‘राजकीय भूकंपाची नांदी’ असते, असे यापूर्वीच्या काही घटनांवरून दिसून येते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.